राहुरी तालुक्यातील माध्यमिक शिक्षकांचे जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर

श्री लक्ष्मीनारायन प्रतिष्ठान श्रीशिवाजीनगर, ता.राहुरी, जि.नगर या संस्थेत शिक्षकांची रीक्त पदे नसताना शिक्षकांना मान्यता देवून शासनाची फसवणूक करून कोट्यवधी रूपये कमविणाऱ्या अधिकारी व सेवकांची चौकशी होईपर्यंत राहुरी तालुक्यातील माध्यमिक शिक्षक आजपासून आमरण जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषणाला बसले आहेत.

राहुरी तालुक्यातील डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखाना संलग्न असलेल्या लक्ष्मीनारायण प्रतिष्ठान या शिक्षण संस्थेच्या पाच विद्यालयामध्ये सन 1995 ते 2007 या कालावधीत रिक्त जागा नसताना अनधिकृतपणे शिक्षक नियुक्त्या देण्यात आल्या असून या प्रकारामुळे अधिकृत नियुक्तीधारक शिक्षकांवर अन्याय झाला असून या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी व संबंधित दोषींवर कारवाई करावी या मागणीसाठी जिल्हा परिषद नगर येथे साहेबराव तोडमल, शिवाजी वाबळे, संगिता शिंदे यांनी आज सकाळपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यास सुरेश करपे, हिरा तोडमल यांनी पाठींबा दर्शविला आहे.

जि. प. माध्यमिक विभाग शिक्षणाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात संस्थेचे शिक्षक साहेबराव तोडमल व शिवाजी वाबळे यांनी म्हटले आहे की, राहुरी तालुक्यातील डॉ. तनपुरे कारखाना संचलित लक्ष्मीनारायण प्रतिष्ठान शिक्षण संस्थेच्या पाच विद्यालयामध्ये सन 1996 पासून अधिकृत नियुक्त्या झालेल्या शिक्षकांना डावलून अनधिकृत प्रकारे दुसऱ्या शिक्षकांना सेवा ज्येष्ठता यादीत घेतले आहे. त्यामुळे पात्र शिक्षकांवर अन्याय झाला असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी यासाठी तक्रार अर्ज केला होता मात्र शिक्षणाधिकारी नगर यांनी कोणतीही कारवाई केली नाही त्यामुळे या प्रकरणाची चौकशी होऊन दोषींवर कारवाई करावी या मागणीसाठी आज दि.1 जानेवारी 2019 पासून जिल्हा परिषद नगर येथे आमरण उपोषणास बसणार असल्याचे साहेबराव तोडमल, शिवाजी शिंदे, हिरा तोडमल, संगीता शिंदे यांनी सांगितले आहे.

दरम्यान, काही शिक्षक संघटनांनी या उपोषणाला पाठिंबा दिला असून शिक्षकांचे वेतन सुरू होण्यापूर्वी महत्वाची असणारी वैयक्तिक मान्यता नियम डावलून देणाऱ्या शिक्षणाधिकारी व संबंधित शिक्षक यांच्यावर कोणती कारवाई होणार याकडे अनेकांचे लक्ष वेधले आहे