हेलिकॉप्टरवर सेल्फी काढणे पडले महागात, बसली कानशिलात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। लखनौ

उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांच्या कार्यक्रमात हेलिकॉप्टरसोबत सेल्फी काढणे एका पोलीस शिपायाला चांगलेच महागात पडले आहे. कारण शिपाई सेल्फी काढत असताना पायलटने त्याच्या जोरदार कानशिलात लगावली. यामुळे ऐन कार्यक्रमात शिपाई व पायलट या दोघांमध्ये जुंपली.

देवारिया येथील भाटपारराणी भागात शैक्षणिक संस्थेचा दीक्षांत समारंभ व शिक्षक संघाच्या अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा हेलिकॉप्टरमधून येणार होते. यामुळे येथे हेलिपॅड तयार करण्यात आले होते. तिथून जवळच असलेल्या सायबर सेलमध्ये शिपाई आलोक सिंह ड्यूटीवर तैनात होता. त्याचवेळी शर्मा यांचे हेलिकॉप्टर आले व ते कार्यक्रमस्थळी निघून गेले. हे बघताच आलोकला हेलिकॉप्टरवर उभे राहून सेल्फी घेण्याचा मोह झाला. आजूबाजूला कोणी नसल्याचे बघून तो सरळ हेलिकॉप्टरवर चढला व सेल्फी काढू लागला. पण त्याचवेळी पायलटचे लक्ष त्याच्याकडे गेले व त्याने आलोकला खाली उतरवले आणि जोरदार कानशिलात लगावली. यावरून दोघांत चांगलीच जुंपली. नंतर इतरांनी मध्यस्थी करत हे भांडण सोडवले.