हवालामार्फत पैशांचा व्यवहार; 36 किलो सोने जप्त

हिंदुस्थानात सोन्याच्या किमती वाढल्यानंतर परदेशी तस्कर हे चोरटय़ा मार्गाने परदेशी सोने मुंबईत आणतात. ते सोने मुंबईत वितळवून त्याची पुन्हा विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) एकाला अटक केली. तसेच 21 कोटी रुपयांचे बेहिशोबी सोने डीआरआयने जप्त केले आहे.

परदेशातील तस्कर हे सोने तस्करीमध्ये सक्रिय असून मुंबईत येणाऱया सोन्याचे पैसे हे हवालामार्फत दिले जात असल्याची माहिती डीआरआयला मिळाली. या टोळीचा पर्दाफाश करण्यासाठी डीआरआयच्या पथकाने ऑपरेशन हाती घेतले.  त्याचा भाग म्हणून डीआरआयचे पथक झव्हेरी बाजार येथे गेले. तेथे एक जण परदेशातून आणलेले सोने वितळत असल्याचे डीआरआयच्या निदर्शनास आले. डीआरआयने  एकाला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली. त्याच्याकडे 36 किलो बेहिशोबी सोने आढळले. डीआरआयने जप्त केलेल्या त्या सोन्याची किंमत सुमारे 21 कोटी रुपये इतकी आहे. ते सोने परदेशी नागरिकाच्या (पॅरिअर) मदतीने मुंबईत आणले. डीआरआयने ताब्यात घेतलेल्या त्या व्यक्तीकडे सुमारे 20 लाखांपेक्षा अधिक बेहिशोबी रोकड रक्कमदेखील आढळली आहे.