माजी मंत्री विनायकदादा पाटील यांचे निधन

ज्येष्ठ नेते, माजी मंत्री, लेखक, साहित्यिक विनायकदादा पाटील यांचे शुक्रवारी रात्री निधन झाले. ते 77 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईत कोरोनावर उपचार सुरू होते. त्यातून बरे होऊन ते नुकतेच नाशिकला घरी परतले होते. अचानक प्रकृती ढासळल्याने शुक्रवारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने राज्यातील अनुभवी नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची श्रद्धांजली
सरपंच ते राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम केलेले कृषी, वनशेती, सहकार क्षेत्रात आपला दूरदृष्टीचा ठसा उमटविणारे राज्याच्या आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी निरपेक्षपणे काम करणारे ज्येष्ठ नेतृत्व गमावले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ नेते विनायकदादा पाटील यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

”विनायकदादा यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करताना कामाचा डोंगर उभा केला. शेतकरी कुटुंबातील विनायकदादा यांनी कुंदेवाडीचे सरपंच ते राज्याच्या मंत्रिमंडळात वेगवेगळी खाती सांभाळताना आपल्या कामाचा ठसा उमटविला. नाशिक जिल्ह्यात सहकार संस्थांचे जाळे तयार केले. वनशेती हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय. वनशेती महामंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी प्रयोग केले. अभ्यासपूर्ण आणि संशोधनात्मक अशा त्यांच्या या प्रयोगाची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही दखल घेण्यात आली. त्यासाठी त्यांना पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. कृषी, सहकार क्षेत्रात काम करणारे प्रयोगशील आणि ज्येष्ठ नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे मार्गदर्शक म्हणून पाहिले जात होते. राज्याच्या आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी निरपेक्षपणे काम करणारे ज्येष्ठ नेतृत्व म्हणून आदराचे स्थान असलेले नेतृत्व आपण विनायकदादांच्या निधनामुळे गमावले आहे. ज्येष्ठ नेते विनायकदादा पाटील यांना विनम्र श्रद्धांजली” अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विनायकदादा पाटील यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या