आतापर्यंत शेअर बाजाराने फक्त 7 वेळा सर्कीट अनुभवले होते, मात्र सर्कीट म्हणजे काय?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शेअर बाजाराने आतापर्यंत फक्त 7 वेळा सर्कीट अनुभवलं होतं. शुक्रवारी म्हणजेच 13 मार्च रोजी शेअर बाजाराने 8व्यांदा सर्कीटचा अनुभव घेतला. यावरून आपल्याला अंदाज येऊ शकतो की ही बाब किती दुर्मिळ आहे. वरचं सर्कीट लागल्यास बाजारात आनंदोत्सव असतो मात्र खालचं सर्कीट लागल्यास त्याचा अर्थ बाजारात पुरी वाट लागली आहे असा होतो. शुक्रवारी सर्कीट अभुनवण्यापूर्वी गेल्या 10 वर्षात शेअर बाजारामध्ये एकही सर्कीट लागलं नव्हतं.

CoronaVirus ‘बाजार’ पाताळात, लोअर सर्कीट लागल्याने शेअर मार्केट 45 मिनिटांसाठी बंद

2004 साली शेअर बाजारामध्ये दोनवेळा सर्कीट लागलं होतं. 2009 साली काँग्रेसच्या नेतृत्वात संयुक्त पुरोगामी आघाडीचं सरकार केंद्रात पुन्हा विराजमान झालं होतं. 18 मे रोजी या बातमीमुळे प्रचंड उत्साह होता. बाजाराचे कामकाज सुरू होताच निर्देशांकाने उसळी मारली होती आणि 10 टक्क्यांच्याही पार गेला होता. यामुळे बाजारामध्ये वरचं सर्कीट लागलं होतं. हे सर्कीट लागल्यानंतर कामकाज एक तासासाठी थांबवण्यात आलं होतं, ते पुन्हा सुरू झाल्यानंतरही निर्देशांक वाढतच गेला.

2008 साली लागले होते खालचे सर्कीट
शेअर बाजारात फक्त 5 वेळा खालचे सर्कीट किंवा लोअर सर्कीट लागलेले आहे. 21 जानेवारी 2008 साली निर्देशांक 2000 अंकांनी कोसळला होता. ज्यामुळे खालचं सर्कीट लागून शेअर बाजाराचे कामकाज शुक्रवार म्हणजेच 13 मार्च 2020 प्रमाणे एक तासासाठी बंद झाले होते. त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 22 जानेवारी 2008 रोजी पुन्हा एकदा निर्देशांक 2000 अंकांनी कोसळला होता, ज्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी खालचे सर्कीट लागले होते. ऑक्टोबर 2017 मध्येही अशीच परिस्थिती पाहायला मिळाली होती.

शेअर बाजारामध्ये अस्थिरतेचं वातावरणात मोठ्या प्रमाणावर विक्रीचे सत्र सुरू होते. यामुळे बाजारात घबराट पसरते आणि ती रोखण्यासाठी सर्कीटची ही व्यवस्था करण्यात आली आहे. किंमती किती वाढल्या अथवा घटल्यावर सर्कीट लागायला हवे हे आदल्या दिवशी बाजार जेव्हा बंद होतो तेव्हाच्या आकड्यांवर अवलंबून असतं.