
सामना प्रतिनिधी । मुंबई
मुंबई शेअर बाजाराने गुरुवारी नवा उच्चांक गाठला. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात २८२.४८ अंकांची वाढ होऊन तो ३६ हजार ५४८.४१ अंकांवर पोहोचला. वीज, तेल, गॅस आणि बँकिंग क्षेत्रात मोठय़ा प्रमाणावर झालेल्या खरेदीमुळे मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात ही वाढ दिसली. ही आतापर्यंतची सर्वात मोठी ऐतिहासिक अशी वाढ आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही ७४ अंकांची वाढ होऊन तो ११ हजार २३ अंकांवर पोहोचला.
महागाईचा उच्चांक
महागाईने त्रस्त असलेल्या जनतेला आणखी चटके बसत आहेत. किरकोळ (रिटेल) महागाईचा दर ५ टक्क्यांवर गेला असून, हा पाच महिन्यांतील उच्चांक आहे. दुसरीकडे मात्र, औद्योगिक उत्पादनात मोठी घट झाली आहे. मे महिन्यात महागाईचा दर ४.८६ टक्के होता. जूनमध्ये ५ टक्के झाला आहे. इंधन आणि विजेचे दर जूनमध्ये ७.१४ टक्क्यांवर गेले आहेत. पर्यायाने पेट्रोल, डिझेल दरवाढीचा परिणाम म्हणून महागाई मोठय़ा प्रमाणावर वाढली आहे.

























































