‘गोमूत्र’ राज्यांत भाजपचा विजय; दक्षिण जिंकू शकत नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
DMK MP Senthil Kumar

डीएमके अर्थात द्रविड मुन्नेत्र कळघमचे खासदार डीएनव्ही सेंथिलकुमार एस यांनी मंगळवारी हिवाळी अधिवेशनादरम्यान केलेल्या वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे. भाजपचा हिंदी भाषिक राज्यांमध्ये किंवा ज्यांना आपण गोमूत्र राज्य म्हणतो, त्या राज्यांमध्ये विजय झाला आहे. त्या ठिकाणीच भाजपची ताकद आहे. ते दक्षिण हिंदुस्थानात जिंकू शकत नाहीत, असे विधान सेंथिलकुमार यांनी केले. त्यावरून नव्या वादाला तोंड फुटले असून भाजपनेही सेंथिल कुमार यांच्या वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने मोठा विजय मिळवल्यानंतर तिन्ही राज्यांमध्ये विजयोत्सव साजरा करण्यात आला, मात्र हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱया दिवशी डीएमके खासदाराने केलेले वक्तव्य भाजप नेत्यांना प्रचंड झोंबले असून अधिवेशनादरम्यानच भाजप खासदारांनी याप्रकरणी प्रतिक्रियाही दिल्या. राज्यातील जनतेने भाजपला मतदान केले असून त्यांचा मोदींवर विश्वास आहे, अशी विधाने करणाऱया लोकांची मानसिकता उथळ असून ते पंतप्रधान मोदींच्या जगभरातील लोकप्रियतेवर जळतात असे भाजप खासदार अन्नपूर्णा देवी म्हणाल्या, तर भाजपला देशभरात स्वीकारले जाते. ज्यांना काहीच माहीत नाही, हिंदुस्थानची संस्कृती माहीत नाही ते अशी विधाने करतात, असे भाजपचे खासदार जगन्नाथ सरकार म्हणाले.