
सामना ऑनलाईन,समारा
कर्णधार अॅलेक्झॅण्डर कोलारोवने ५६ व्या मिनिटाला फ्री किकवर दमदार गोल करीत सर्बियाला फिफा वर्ल्ड कपमधील ‘ई’ गटात कोस्टारिकावर १-० अशा फरकाने विजय मिळवून दिला. ३४ व्या रँकिंगवर असलेल्या सर्बियासाठी गेल्या २८ वर्षांमध्ये फ्री किकवर नोंदवण्यात आलेला पहिलाच गोल ठरला हे विशेष. ऍलेक्झॅण्डर कोलारोव याचीच या लढतीत सामनावीर म्हणून निवड करण्यात आली.
उत्तरार्धात गोलशून्य बरोबरी
कोस्टारिका व सर्बिया यांच्यामधील ‘ई’ गटातील लढतीला समारा स्टेडियममध्ये सुरुवात झाली. पहिल्यांदाच दोन्ही संघ एकमेकांसमोर उभे ठाकले होते. पूर्वार्धात दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले. फिफा रँकिंगमध्ये २५व्या स्थानावर असलेल्या कोस्टारिकाकडून या लढतीत चमकदार कामगिरीची अपेक्षा बाळगली जात होती.
चार यलो कार्ड
सर्बिया व कोस्टारिका यांच्यामधील लढतीत रेफ्रींकडून चार यलो कार्ड दाखवण्यात आले. दोन्ही संघांतील प्रत्येकी दोन खेळाडूंना याला सामोरे जावे लागले. सर्बियाकडून ब्रॅनीस्लाव इवानोविच व ऍलेक्झॅण्डर प्रिजोविच यांना यलो कार्ड मिळाले. फ्रान्सिस्को काल्वो व डेव्हिड गुजमॅन या कोस्टारिकाच्या खेळाडूंनाही रेफ्रींकडून यलो कार्ड मिळाले.





























































