
सामना ऑनलाईन । नगर
नगर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवरांची लगबग सुरू आहे. मात्र, दोन दिवसांपासून सर्वर सुरू नसल्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्यामध्ये अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी एका दिवसाने मुदत वाढवून द्यावी अशी मागणी शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी राज्याचे निवडणूक आयुक्तांकडे केली आहे. याबाबतचे लेखी निवेदन त्यांनी आयुक्तांना दिले आहे.
नगर शहरामध्ये महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. 20 तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करायचे आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करताना ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. ऑनलाईन पद्धतीमध्ये अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. गेल्या दोन दिवसांपासून नगर शहरामध्ये आयोगाचे सर्व्हर डाऊन झाल्यामुळे इच्छुक उमेदवारांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. सर्व्हर डाऊन असल्याने ऑनलाईन अर्ज भरता येत नाही. त्यामुळे आता उमेदवारांना मुदत वाढवून द्यावी अशी मागणी शिवसेनेचे उपनेते आणि राज्य निवडणूक आयोगाचे अध्यक्षांकडे केली आहे.
































































