साडेसात लाखाचा मुद्देमाल हस्तगत, एटीएम मशिन चोरणारी टोळी 48 तासात गजाआड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

समशेरपूर (ता. अकोले) येथील एटीएम मशिन चोरी करणारी टोळी 7 लाख 52 हजार रूपये किमतीच्या मुद्देमालासह 48 तासात जेरबंद केली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने केली.

समशेरपूर फाटा (ता. अकोले) 23 येथील आदिवासी सहकारी सोसायटी कॉम्प्लेक्सच्या गाळ्यामधील एटीएम मशिनला दोरखंड बांधून एटीएम मशिन चारचाकी गाडीने बाहेर ओढुन चोरुन नेले होते. याप्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोनि आहेर यांना माहिती मिळाली की, भरत लक्ष्मण गोडे (रा. तिरडे, ता. अकोले) याने साथीदारांसह एटीएम मशिन चोरुन नेले आहे. त्यावरून गुन्हे शाखेचे पथक गोडे याची माहिती घेत असताना तो त्याच्या राहत्या घरी साथीदारांसह थांबलेला असल्याची माहिती मिळाली. पथकाने सापळा रचून संशयीत इसमांना ताब्यात घेतले. त्यांनी त्यांची नावे भरत लक्ष्मण गोडे (वय 24, रा. तिरडे, ता. अकोले), सुर्यभान उर्फ काळ्या लक्ष्मण गोडे (23), अशोक रघुनाथ गोडे (25), सुयोग अशोक दवंगे (वय 20, रा. हिवरगाव पठार, ता. संगमनेर), अजिंक्य लहानु सोनवणे (वय 21, रा. चिंचोली गुरव, ता. संगमनेर) असे असल्याचे सांगितले. त्यांच्याकडे गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता, त्यांनी त्यांचा पसार साथीदार गणेश लहु गोडे (रा. तिरडे, ता. अकोले) याच्यासह गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांनी सदरचे एटीएम मशीन म्हसवड वळणाचा घाट, एकदरी गावाच्या शिवारात नेऊन गॅस कटरने कट करुन त्यामधील पैसे वाटुन घेतले असल्याचे सांगितले. त्यांच्याकडे 1 लाख 42 हजार रुपयांची रोख रक्कम, गुन्ह्यात वापरलेली बोलेरो गाडी, गुन्ह्याचे वेळी वापरलेले मोबाईल व तुटलेले एटीएम मशिन असा एकुण 7 लाख 52 हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि हेमंत थोरात, पोहेकॉ बबन मखरे, दत्तात्रय गव्हाणे, मनोहर गोसावी, बापुसाहेब फोलाणे, पंकज व्यवहारे, पोना रविंद्र कर्डीले, फुरकान शेख, संतोष खैरे, विशाल गवांदे, पोकॉ अमृत आढाव, मेघराज कोल्हे यांच्या पथकाने ही कारवाई केली.