कर्तृत्ववान महिलांचा अनोखा सन्मान, मोदींच्या ‘सोशल मीडिया’ची सातजणींनी सांभाळली धुरा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी महिला दिनानिमित्त आपले सोशल मीडिया अकाऊंट देशाच्या विविध क्षेत्रांतील सात कर्तृत्ववान महिलांच्या हाती सोपवले होते. संपूर्ण दिवसभर या महिलांनी पंतप्रधानांचे अकाऊंट हाताळताना देशवासीयांसमोर आपला प्रेरणादायी प्रवास उलगडला.

पंतप्रधान मोदींनी गेल्या आठवड्यात आपण सोशल मीडियाला रामराम ठोकणार असल्याचे संकेत दिले होते, परंतु दुसर्‍याच दिवशी आपला तसा विचार नसल्याचे स्पष्ट करीत महिलादिनी आपले सोशल मीडिया अकाऊंट कर्तृत्ववान महिलांच्या हाती सोपवणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार रविवारी देशभरातील सात कर्तृत्ववान महिलांनी पंतप्रधान मोदींच्या ट्विटर, इन्स्टाग्राम, फेसबुक आणि यू टय़ूब हॅण्डलवरून स्वतःच्या प्रेरणादायी कार्याची माहिती देशवासीयांसमोर सादर केली. या महिलांच्या कर्तृत्वाला देशवासीयांनी भरभरून दाद दिली.

या महिलांनी हाताळले मोदींचे ’सोशल मीडिया’

फूड बँक इंडियाची संस्थापिका स्नेहा मोहनदास, बॉम्बस्फोटात दोन्ही हात गमावूनही प्रेरणादायी कार्य करणारी मालविका अय्यर, कश्मीरची आरिफा, जल संरक्षणासाठी काम करणारी कल्पना रमेश, गोरमाटी कलेला चालना देणारी महाराष्ट्रातील विजया पवार, स्वच्छतेसाठी आग्रही असलेली कानपूरची कलावतीदेवी आणि मुंगेरची वीणादेवी.