
अमेरिकेतील अटलांटा भागात असलेल्या एका स्पा सेंटरमध्ये अंदाधुंद गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबारात 8 जणांचा मृत्यू झाला होता. हा गोळीबार करणाऱ्या 21 वर्षांच्या तरुणाला अटक करण्यात आली होती. घटनेनंतर अशी भीती वर्तवण्यात येत होती की हा हल्ला वर्णद्वेषातून करण्यात आला होता. मात्र आतापर्यंतच्या पोलीस तपासातून हा हल्ला वर्णद्वेषातून झाला नसल्याचं कळालं आहे. या हल्ल्यामागे भलतंच कारण होतं. आरोपी एरॉन लाँग याने आपण सेक्सच्या आहारी गेलो असल्याने हा हल्ला केला होता अशी कबुली दिली आहे.
लाँगने म्हटलंय की त्याला सतत या स्पा सेंटरमध्ये जायची इच्छा होत होती. यामुळे त्याची सेक्स करण्याची इच्छाही वाढायला लागली होती. ही इच्छा कमी करण्यासाठी स्पा सेंटर उध्वस्त करायचं होतं असं लाँगने म्हटलं आहे. लाँगने केलेल्या हल्ल्यात 6 आशियाई महिलांचा मृत्यू झाला होता. यामुळे हा हल्ला वर्णद्वेषातून झाला असावा अशी भीती वर्तवण्यात येत होती.
वासनांध, लिंगपिसाट झाल्याने आरोपीने भयंकर कृत्य केल्याची ही पहिली घटना नाहीये. हॉलीवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक हार्वी विन्स्टीन, सिरीअल किलर टेड बन्डी, 3 मुलींचे अपहरण करणाऱ्या एरिअल कॅस्ट्रो यासारख्या आरोपींनी आपण सेक्सच्या आहारी गेल्याने तसेच पॉर्न व्हिडीओ पाहण्याचे व्यसन लागल्याने गुन्हा केल्याचे कबूल केलं होतं. या आरोपींनी जरी ही बाब आपल्या गुन्ह्यासाठी जबाबदार असल्याकडे बोट दाखवलं असलं तरी सेक्सचं व्यसन लागलेल्या व्यक्तींचा अभ्यास करणाऱ्या संशोधकांनी ही बाब मान्य करण्यास नकार दिला आहे. या दोन्हीचा मानसिक आजाराशी काहीही संबंध नसल्याचं संशोधकांचं म्हणणं आहे. काही शास्त्रज्ञांच्या मते आपला गुन्हा लपवण्यासाठी गुन्हेगार अशा पद्धतीचे बहाणे पुढे करत असतात. गोळीबाराच्या घटनेतील आरोपी लाँग हा सेक्सचे व्यसन सोडवण्यासाठी एका पुनर्वसन केंद्रात उपचार घेत होता. जवळपास 6 महिने तो तिथे असल्याचंही पोलिसांना कळालं आहे.



























































