माजी स्टार फिरकीवीर शेन वॉर्न विकतोय मेलबर्नमधील राजेशाही निवासस्थान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऑस्ट्रेलियाचा माजी स्टार फिरकीपटू शेन वॉर्नने मेलबर्न येथील त्याचे आलिशान घर विकण्याचा निर्णय घेतला आहे. वॉर्नने हे घर २००८ साली अॅस्सेनडन फुटबॉल क्लबचा दिग्गज खेळाडू मॅथ्यू लॉयड याच्याकडून ५.४ मिलियन डॉलर म्हणजे जवळपास ४० कोटींना विकत घेतले होते. आता या घराचा लिलाव ४ एप्रिल रोजी होणार आहे.

शेन वॉर्न नेहमीच त्याच्या स्टायलिश राहणीमानामुळे सतत चर्चेत असतो. त्याचे घर देखील अशाच कॅटेगरीत येणारे आहे. वॉर्नच्या घरात अनेक हायटेक सुविधा आहेत. बाथरूमची सुविधा असलेले पाच बेडरूम, वाईन सेलर, होम थिएटर, स्विमिंग पूल आणि स्पा अशा स्वप्नवत सुविधा या घरात आहेत.

वॉर्नला होऊ शकतो १५ कोटींचा फायदा
वॉर्नने जेव्हा हे घर विकत घेतले तेव्हा त्याने जवळपास ४० कोटी रुपये मोजले होते. आता मार्केट रेटनुसार या घराची किमत ६८ लाख म्हणजे ५१ कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. लिलावात या घराला ७.४ म्हणजे ५५ कोटींपेक्षा अधिक किमत मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.वॉर्नसाठी हा व्यवहार फायद्याचा ठरणार आहे. जर ठरल्याप्रमाणे व्यवहार झाला तर वॉर्नला १५ कोटींचा फायदा होऊ शकेल.याआधी शेन वॉर्न अशाच एका कारणामुळे चर्चेत आला होता. ऑस्ट्रेलियातील जंगलाला लागलेल्या भीषण आगीतील पीडितांसाठी वॉर्नने त्याच्या ग्रीन टेस्ट कॅपचा लिलाव केला होता. तेव्हा त्या कॅपला १० लाख ७ हजार ५०० ऑस्ट्रेलियन डॉलर म्हणजे ४ कोटी ९२ लाख ८ हजार इतकी बोली मिळाली होती