
सामना प्रतिनिधी । नांदेड
किवळा येथील साठवण तलावासाठी आपल्या प्रयत्नामुळे मंजुरी मिळाली अशी खोटी माहिती देऊन कंधार-लोहाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी जनतेची घोर फसवणूक केली आहे, असा आरोप राष्ट्रवादी किसान भारतीचे प्रदेशाध्यक्ष शंकरअण्णा धोंडगे यांनी केला. पत्रकार परिषदेत शंकरअण्णा बोलत होते.
गोदावरी पात्रातील अंतेश्वर बंधारा व किवळा येथील साठवण तलाव झाल्यास विष्णूपुरीवरील नांदेड शहराच्या पिण्याच्या पाण्याचा भार कमी होवून विष्णूपुरी प्रकल्प पूर्णपणे शेतीसाठी उपयोगात येईल या हेतूने आघाडी सरकारच्या काळात अजित पवारांच्या माध्यमातून या प्रकल्पाला आधीच मंजुरी घेण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर या कामाची निविदा 16 मे 2012 रोजी काढण्यात आली असून 27 जुलै 2013 रोजी कार्यारंभ आदेशही (वर्कऑर्डर) देण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर या प्रकल्पासाठी प्राथमिक भूसंपादनासाठी दहा कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पातही करण्यात आली होती. असे असताना आपल्या साडेचार वर्षाच्या कारकीर्दीत एक दमडाही या प्रकल्पाला न देता हा प्रकल्पच आपल्या प्रयत्नामुळे आला असल्याचे खोटे विधान प्रताप पाटील यांनी केले आहे. ही बाब जनतेसमोर आणण्यासाठी ही पत्रकार परिषद बोलाविण्यात आले आहे, असेही शंकरअण्णा धोंडगे यांनी सांगितले.
किवळा साठवण तलावाबाबत खोटे विधान करुन प्रताप पाटलांनी जनतेची दिशाभूल तर केलीच आहे, परंतू लिंबोटी धरणातून पालम तालुक्याला पाणी देण्याच्या योजनेस पाठिंबा देवून चिखलीकरांनी स्वार्थासाठी तालुक्यातील लोकांना देशोधडीला लावण्याचे पाप केले आहे, असाही आरोप शंकरअण्णा धोंडगे यांनी केला. पालम तालुक्यासाठी पाणी पुरवठा करण्यास दिग्रस बंधारा सक्षम असताना आणि तसे करणे सोयीचे असताना लिंबोटी धरणातून पाणी आणण्याची योजना केवळ कंत्राटदाराच्या घश्यात पैसे घालण्यासाठी आखली जात आहे, असाही आरोप शंकरअण्णा धोंडगे यांनी केला.






























































