
नगरमध्ये काही शक्ती धर्माच्या नावाने अंतर वाढवून दंगली घडवत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. यावेळी त्यांनी कर्नाटकचे उदाहरण देत सत्तेचा वापर करून द्वेष पसरवल्याचा आरोप करत जनतेने अशा शक्तींना धडा शिकवल्याचे पवार यांनी सांगितले. कर्नाटकात जे होऊ शकते, तर देशातील कोणत्याही राज्यात होईल यासाठी प्रयत्न करणे आपली जबाबदारी असल्याचे मत शरद पवार यांनी व्यक्त केलं. ते रविवारी नगरमध्ये बोलत होते.
धर्माच्या नावाने अंतर वाढवले जात आहे. हा नगर जिल्हा पुरोगामी जिल्हा म्हणून ओळखला जातो. अनेक ऐतिहासिक काम करणारे मान्यवर या जिल्ह्यात होऊन गेले. याच नगर जिल्ह्यात शेवगावला दोन ते तीन दिवस बाजारपेठ बंद होती. काही शक्ती जाती-जातीत अंतर वाढवून संघर्ष वाढवत आहे. त्या शक्तीशी लढाई करणं, संघर्ष करण्याचं आव्हान माझ्यासह तुमच्यासह सर्वांवर आहे. हे केलं नाही, तर कष्ट करणाऱ्यांचं जीवन उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी आपण तयारी केली पाहिजे, असेही शरद पवार म्हणाले.
देशातील चित्र बदलत आहे. कर्नाटकात नवे सरकार आले आहे. तिथे अनेक वर्ष सत्ताधाऱ्यांनी जनतेत द्वेष पसरवण्याचं काम केलं. सर्व देशाला वाटत होतं की, कर्नाटकची निवडणूक सत्ताधारी भाजप जिंकणार. मात्र, आता तिथे सर्वसामान्य माणसाचे सरकार सत्तेत आले आहे. यावेळी एक लाखापेक्षा अधिक लोक शपथविधीला हजर होते. त्यापैकी 70 टक्के तरुण होते आणि सर्व जातीजमातीमधील होते.
कर्नाटकात एक धनगर समाजाचा माणूस मुख्यमंत्री झाला. तो कष्टकरी आहे आणि तेथील लोकांच्या हिताची जपवणूक करतो. अशा लहान जातीवर्गातील व्यक्तीने कर्नाटकात मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. हे घडले कारण कष्टकरी लोकांची एकजुट होती. ती एकजुट कर्नाटकात होऊ शकते, तर देशाच्या इतर राज्यातही झाली पाहिजे यासाठी प्रयत्न करण्याचा हा काळ आहे, असेही पवार म्हणाले.






























































