ज्यांना पक्ष उमेदवारीसाठी योग्य समजत नाही, त्यांनी बारामतीची चर्चा करू नये; शरद पवारांचा बावनकुळेंना टोला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपच बारामती जिंकणार, असा विश्वास व्यक्त केला आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बावनकुळे यांना जबरदस्त टोला लगावला आहे. तसेच देशात बारामतीचे महत्त्व आहे. बारामतीचे नाव घेतल्याशिवाय बातमी होत नाही. त्यामुळे अनेकजण बारामतीचे नाव घेत आहे, असेही शरद पवार म्हणाले.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी 51 टक्के मते घेऊन आम्ही बारामती जिंकणार असा विश्वास व्यक्त केला होता. त्यावरून शरद पवारांनी बावनकुळे यांना टोला लगावला आहे. ज्या व्यक्तिला स्वत:चा पक्ष उमेदवारीसाठी योग्य समजत नाही. त्यांनी बारामतीची चर्चा करण्याचे काहीही कारण नाही, असा टोला शरद पवार यांनी लगावला. शरद पवार रविवारी बारामती दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी भाजपवर टीका करत बावनकुळे यांना टोला लगावला.

बारामतीचे नाव घेतल्याशिवाय बातमी होत नाही. अखंड देशाला बारामतीचे महत्व माहिती आहे. म्हणूनच ते वारंवार बारामतीचे नाव घेतात. त्यांनी बारामतीची चर्चा करण्याचे काहीही कारण नाही. त्यांना भाजपने तिकिट नाकारले. म्हणजे त्यांना पक्षच त्यांचा उमेदवारीसाठी योग्य समजत नाही. त्यामुळे त्यांनी बारामतीबाबत बोलू नये. तसेच त्यांच्याबाबत आपण बोलण्याचीही गरज नाही.असे पवार म्हणाले. सध्या निवडणुका लागलेल्या पाच राज्यांमध्ये भाजपला लोक बाजूला करतील असे चित्र आहे. सध्या बदल करण्याची भावना देशामध्ये आहे. देशातील 70 टक्के राज्यांमध्ये भाजप नाही. अन् जिथे या निवडणुका आहेत. या निवडणुकींचा कौल भाजपाच्या विरोधात असल्याचे दिसते असे त्यांनी यावेळी सांगितले.

जरांगे पाटील आणि सरकारमध्ये काही सुसंवाद झाल्याचे व सरकारने वेळ घेतल्याचे दिसते. याबाबत सरकार काय करते आहे याकडे आमचे लक्ष आहे. या दोन दिवसानंतर सरकारची भूमिका स्पष्ट होईल असं दिसत आहे. यातून मार्ग निघाला, प्रश्न सुटला तर मनापासून आनंद होईल,असे पवार म्हणाले. कंत्राटी भरती बाबत पवार म्हणाले, मी मंत्रिमंडळाच्या बैठकीला जात नाही.जाण्याचे काय कारण नाही. महाराष्ट्रात दोन उपमुख्यमंत्री आहेत. एकाच मत तुम्ही सांगितलं. दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांनी आज त्याच्यावर टिप्पणी केली आहे. त्यात हे स्पष्ट दिसते की ज्या वेळेला त्यासंबंधीचा निर्णय घेतला गेला. त्या निर्णयाच्या बैठकीला अनेक सहकारी हजर होते. ते आजही सरकारमध्ये आहेत. त्यावेळी त्यांची संमती होती. आज त्यासंबंधीचं भाष्य करत नाहीत. कंत्राटी कामगारांच्या संबंधीची अस्वस्थता कशाची होती. नोकरीमध्ये शाश्वती नाही. ठराविक काळासाठीच नोकरी आहे. दहा अकरा महिन्यांची नोकरी म्हटल्यानंतर त्या व्यक्तीच्या जीवनात स्थैर्य नाही. त्यामुळे अशा पद्धतीने जागा भरणे योग्य नाही, असेही ते म्हणाले.