आत्मविश्वासाला धक्का बसतो तेव्हा लोक अशा गोष्टीकडे जातात, शरद पवार यांचा मुख्यमंत्र्यांना टोला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिर्डी दौऱ्यावर गेलेले असताना अचानक त्यांनी सिन्नर येथे एका ज्योतिषाची भेट घेतल्याची चर्चा रंगली आहे. त्यावरून त्यांच्यावर टीका देखील होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत या मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोले लगावले आहेत.

पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांच्या सिन्नर दौऱ्याविषयी विचारले असता त्यांनी शेलक्या भाषेत मुख्यमंत्र्याना टोले लगावले आहेत. ”मी काही ज्योतिषी नाही, त्यामुळे मी काही सांगू शकणार नाही. माझा त्यावर विश्वासही नाही, त्यामुळे मी दौरा सोडून हात दाखवायला कुठे जात नाही. आपण आता हल्ली नवीन गोष्टी पाहत आहोत. महाराष्ट्रात याआधी असे होत नव्हते. आसाममध्ये काय घडले हे सर्व देशाला माहिती आहे. आता पुन्हा एकदा आसामची ट्रीप होणार असल्याचे मी वाचले. त्याच्याशी सुसंगत कार्यक्रम बंद करुन शिर्डीला जाणे आणि नंतर सिन्नरला जाऊन कोणाला तरी हात दाखवणे या गोष्टी आमच्यासाठी नवीन आहेत. महाराष्ट्र पुरोगामी विचारांचे राज्य आहे, विज्ञानाचा पुरस्कार करणारे राज्य म्हणून लौकीक आहे. महाराष्ट्रात या नवीन गोष्टी पाहायला मिळत आहेत. माझी खात्री आहे की, सुविद्य पिढी या सर्व गोष्टींचा स्वीकार करणार नाही. हे जनता दाखवल्याशिवाय राहणार नाही. आत्मविश्वासाला धक्का बसतो तेव्हा लोक अशा गोष्टीकडे जातात”, असा टोला शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.