
एकनाथ खडसे यांची पक्ष प्रवेशाच्या वेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा झाली. त्यांनी माझ्यासोबतही चर्चा केली त्यावेळी त्यांनी अपेक्षा न करता काम करण्याची इच्छा असल्याचेच सांगितले. त्यामुळे बातम्यांत ज्या चर्चा रंगल्या त्याला अर्थ नाही. जे जिथे आहेत ते त्याच ठिकाणी काम करीत राहतील, मंत्रिमंडळात काही बदल होणार नाही, असे सांगत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एकनाथ खडसे यांच्यासाठी कुणाचे मंत्रीपद पणाला लागणार या चर्चांना पूर्णविराम दिला.
एकनाथ खडसे यांच्या पक्षप्रवेशाचा हा दिवस आनंदाचा दिवस असल्याचे सांगून शरद पवार यांनी खडसे यांचे राष्ट्रवादीत स्वागत केले. यावेळी त्यांनी माध्यमांत रंगलेल्या चर्चांचा समाचार घेतला. शरद पवार म्हणाले, एकनाथ खडसे यांनी दुर्दैवाने पक्ष सोडण्याचा निर्णय घ्यावा लागत असल्याचे सांगितले. राष्ट्रवादीत येताना त्यांनी कोणतीही अपेक्षा व्यक्त केली नाही. त्यामुळे या चर्चांना काही अर्थ नाही.
राष्ट्रवादीत काही गडबड नाही
वृत्त वाहिन्यांनी अजित दादा नाराज आहेत जाहीर केलं, असे सांगून नाराजी व्यक्त करताना शरद पवार म्हणाले, कोरोनाच्या काळात काळजी घ्यावी लागते. जितेंद्र आव्हाड गृहनिमाण खात्याचे मंत्री यांना 20 दिवस त्यांना व्हेंटिलेटरवर काढावे लागले. आम्ही लोकांच्यात राहणारे लोक आहोत. अनेक मंत्र्यांना यामुळे त्रास झाला. त्यामुळे सगळ्यांच्या बाबतीत काळजी घेत आहोत असे सांगत एखादा सहकारी इथे नसेल तर याचा अर्थ काही गडबड आहे असा नाही. राष्ट्रवादीत काही गडबड नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
नाथाभाऊ काय चीज आहे ते दाखवून देऊ
खान्देश हा पूर्वी गांधी-नेहरूंच्या विचारांचा पक्ष होता. त्यानंतर नाथाभाऊंनी नवीन पिढी उभी केली. नाथाभाऊंसारखी लोकांचे प्रश्न सोडविणारी व्यक्ती जळगाव जिह्याला मिळाली. आता नाथाभाऊ राष्ट्रवादीत आल्याने त्या ठिकाणी पुन्हा राष्ट्रवादी विचारांनी चालणारे चित्र बघायला मिळेल अशी आशा व्यक्त करतानाच शरद पवार यांनी नाथाभाऊंनी शब्द दिला म्हणजे दिला. आता काळजी करण्याचे काम नाही. पुढील काळात जळगावात जाऊन मोठं शक्तिप्रदर्शन करून नाथाभाऊ काय चीज आहे, हे महाराष्ट्राला दाखवून देऊ असे शरद पवार म्हणाले.
सुसंस्कृत महाराष्ट्रात असं सूडाचं राजकारण झालं नाही – जयंत पाटील
मागील चार-पाच वर्षांत अशा काही घटना घडल्या. कटकारस्थानं झाली की पहिल्या रांगेत बसलेल्या नेत्याला सभागृहात मागच्या रांगेत नेऊन बसवण्याचं काम भाजपमध्ये झाले. खडसे यांच्यावरील अन्यायाबाबत सर्वात आधी मीच बोललो. पण आज त्यांना कळेल अभी भी पिक्चर बाकी आहे. राजकारण झालं पण सूडाचं राजकारण झालं नव्हतं. कारण महाराष्ट्राची तशी संस्कृती नाही, असा टोला यावेळी फडणवीस यांना लगावला.






























































