शेअर मार्केटमधून परताव्याच्या आमिषाने साडेतीन कोटींची फसवणूक, मिरज ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवून सांगली जिल्ह्यासह कर्नाटकातील गुंतवणूकदारांची तीन कोटी 36 लाखांची फसवणूक करण्यात आल्याची घटना उघड झाली आहे. याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

समीर अख्तर हुसेन (वय 37, रा. तासगाव फाटा, मिरज) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. योगेश शांतीनाथ घस्ते (वय 38, रा. पंढरपूर रोड, इस्राईलनगर, मिरज) यांनी फिर्याद दिली आहे.

समीर हुसेन याची ड्रीम मल्टी ट्रेड सर्व्हिसेस ही शेअर मार्केटची कंपनी आहे. समीर हुसेन याने 47 लोकांना महिन्याला 12 ते 25 टक्केप्रमाणे नफ्याचे आमिष दाखवून घस्ते आणि त्यांचे नातेवाईक, मित्र व इतरांकडून 3 कोटी 36 लाख 65 हजार रुपये भरून घेतले. ते पैसे परत देण्यास टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. याबाबत त्याच्या घरी जाऊन विचारणा करण्यासाठी गेले असता तासगाव फाटय़ाजवळील त्याच्या घरी तो नसल्याचे निदर्शनास आले. फोनही उचलत नसल्याने योगेश घस्ते यांनी मिरज ग्रामीण पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.