शायरा बानोचे भाजपमध्ये जाण्याचे संकेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, देहरादून 

तिहेरी तलाक बेकायदेशीर होण्यासाठी लढलेल्या शायरा बानो यांनी भाजपमध्ये जाण्याचे संकेत दिले आहे. या संदर्भात बोलताना शायरा म्हणाल्या की “केंद्र सरकार समान नागरी कायदा लागू करण्यासाठी बांधील आहे, तसेच बहुपत्नीत्वामुळे जे तोटे होतात त्याचा विचार केंद्र सरकार करत आहे. मुस्लिमांविषयी भाजपचे धोरण पाहता जर मला संधी मिळाली तर मी पक्षात प्रवेश करेन.”

उत्तराखंडचे भाजप प्रदेशाध्यक्ष अजय भट्ट यांनी तर शायरा बानो या पक्षात प्रवेश करणार असल्याचे जाहीरही केले आहे. मोठ्या धुमधडाक्यात शायरा बानो यांचा पक्ष प्रवेश होईल अशी माहिती देताना ते म्हणाले की “शायरा बानो यांच्या प्रवेशामुळे भाजप मुस्लिम विरोधक आहे असे म्हणणार्‍या लोकांना चपराक बसेल, आम्ही धर्माच्या आधारावर पक्ष सदस्यांचा भेद करत नाही.” या महिनाअखेर त्यांचा पक्ष प्रवेश होईल असे त्यांनी यावेळी सांगितले. तर दुसरीकडे काँग्रेसने याप्रकरणी टीका करत २०१९ निवडणुकीसाठी मुस्लिम महिलांना आकर्षित करण्यासाठी हे पाऊल उचलल्याचे सांगितले.

शायरा बानो या उत्तराखंडमधील उधमसिंह येथे काशीपुरा भागातल्या रहिवासी आहेत. २०१६ मध्ये त्यांनी तिहेरी तलाकविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यावर त्या प्रकाशझोतात आल्या. २०१७ मध्ये सुप्रीम कोर्टाने तिहेरी तलाक ला बेकायदेशीर ठरवले होते व शायरा बानो यांचा विजय झाला होता.