शिंदे गटातील खासदारचा फुसकाबार; तो दावा ठरला फोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
krupal-tumane

मुंबई येथील बीकेसी मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्यात शिवसेनेचे पाच आमदार आणि दोन खासदार शिंदे गटात प्रवेश करणार, असा दावा शिंदे गटातील खासदार कृपाल तुमाने यांनी दसरा मेळाव्याच्या दिवशी केला होता. मात्र सायंकाळी मेळावा पार पडल्यानंतर या दाव्यातील हवा निघून गेली.

बीकेसीवरील मेळाव्यात कुठल्याच शिवसेनेचा कोणताही आमदार किंवा खासदार शिंदे गटात गेला नाही. त्यामुळे शिंदे गटातील खासदार आणि आमदारांकडून केले गेलेले दावे फोल ठरले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुंबईतील मेळाव्यात मोठा राजकीय भूकंप घडणार, उद्धव ठाकरे गटाचे काही आमदार, खासदार प्रवेश करणार या बातम्या दिवसभर सुरू होत्या. मात्र प्रत्यक्षात असे काहीच घडले नाही. उलट शिंदे गटाच्या मेळावा फ्लॉप शो ठरल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर फिरत होत्या. अनेक मीम्स देखील व्हायरल झाले होते.

तुमाने यांच्या दाव्यानंतर धाराशिवचे शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी ‘कोणीही कुठे जाणार नाही’ असे स्पष्ट केलं होतं आणि अखेर तेच खरं ठरलं. ‘उद्धवसाहेबांच्या विचाराच सोनं लुटण्यासाठी मराठवाड्यातील आमदार, खासदारासह सर्व एकनिष्ट शिवसैनिक मोठ्या संख्येने शिवतीर्थावर दिसतील. कोण कुठे जाणार याला आता महत्व राहिलेलं नाही. कोणी कितीही दावे केले तरी जनता उद्धवसाहेबांच्या सोबत आहे’, असा ओमराजे निंबाळकर यांनी व्यक्त केला होता. हा विश्वास सार्थ ठरल्याचं दसरा मेळाव्यानंतर स्पष्ट झालं.