शिरीषायन – मोठ्यांच्या छोट्या गोष्टी – 23

>> शिरीष कणेकर

लता मंगेशकर राहाते त्या पेडर रोडवरच्या चौकाला संगीतकार कल्याणजींचे नाव दिलंय. (खोटं वाटत असेल तर डोळय़ांनी बघून या.) हे म्हणजे पु. ल. देशपांडे राहायचे त्या चौकाला माझं नाव देण्यासारखं आहे. दिलीप कुमार पाली हिलवर राहातो त्या भागाला भारत भूषणचं नाव देण्याची कल्पना कशी वाटते? तुम्ही भारत भूषणचा सन्मान करीत नसून दिलीप कुमारचा घोर अपमान करीत आहात. एकच रुपेरी पडदा सारख्याच निर्विकारपणे दोघांचेही चित्रपट दाखवत असेल, पण म्हणून तुम्ही त्यांना एकाच तागडीत तोलाल की काय!

गाणारे भूगंधर्व व गाणाऱ्या गानकोकिळा गाताना गाऊन गेले. आपण नायक व नायिका यांच्यासाठी गातोय असे ते गृहीत धरून चालले, पण प्रत्यक्षात पडद्यावर ते कोणाच्या तोंडी जातेय याबाबत त्या गायकांना व गायिकांना काही‘से’ असेल असे वाटत नाही. नाहीतर मला सांगा, ‘मैं नशे में हूँ’मधले ‘किसी नर्गिसी नजर को दिल देंगे हम’ हे मुकेशच्या तोंडचे बहारदार गाणे पडद्यावर मारुतीवर चित्रित केले गेलंय! नायक राज कपूर असताना? कवीने कल्पकतेने गाण्यात ‘नर्गिसी नजर’ हे शब्द योजलेत. मग ते मारुतीने उच्चारून कसे चालेल? सगळाच बार फुसका ठरत नाही का? ते गाणं मारुतीसाठी नसणार हे उघड आहे. राज कपूर काही कारणाने उपलब्ध नसल्याने ते गाणे मारुतीवर उरकून टाकण्यात आले असणार. त्या काळी हे असे चालायचे. ते कोणाच संबंधिताला खटकत नसावे. अन् कोणाला खटकत असले तर त्याच्या मताचे म्हणण्यासारखे वजन पडत नसावे. आता हे शक्य नाही. ‘मेरे हाथों में नौ नौ चुडियाँ’ किंवा ‘डोली सजा के रखना’ किंवा ‘जिंदगी एक सफर है सुहाना’ किंवा ‘सलामे इश्क मेरी जाँ’ ही गाणी पडद्यावर अनुक्रमे श्रीदेवी, शाहरूख खान, राजेश खन्ना आणि रेखा यांनी न म्हणता कोणा आंडूपांडूने म्हटलेली आपल्याला चालले असते? ‘ये मेरा दीवानापन है’ दिलीप कुमारनेच म्हणायचे. ‘उनसे प्यार हो गया’ मधुबालानेच म्हणायचे. ‘मेरी जाँ मेरी जाँ’ मीनाकुमारीनेच म्हणायचे. ‘बलमा बडा नादान’ गीता बालीनेच म्हणायचे. ‘हम है राही प्यार के’ देव आनंदनेच म्हणायचे. ‘नजर लगी राजा तेरे बंगले पे’ नलिनी जयवंतनेच म्हणायचे. ‘तोड दिया दिल मेरा’ नर्गिसनेच म्हणायचे. त्या त्या गाण्यांवर त्या त्या नायिकांचा शिक्का बसलाय. मधुबालाचे ‘आयेगा आनेवाला’ कोणा फुटकळ उपनायिकेने सोडा, अगदी मीनाकुमारीने पडद्यावर म्हटलेलंही आपल्याला चालणार नाही.

‘चाहे नैना चुराओ, चाहे दामन बचाओ’ (‘आस’ – शंकर- जयकिशन, लता, शैलेंद्र, साल 1953) हे भन्नाट गाणं पडद्यावर नायक शेखर व नायिका कामिनी कौशल यांच्यावर नाही, तर आपली तोंडओळखही नसलेल्या कोणा अपरिचित जोडीवर चित्रित करण्यात आलंय. हे अवसानघातकी तर आहेच, पण तलतच्या शब्दांवर तो पुरुष बायकी मुद्रा व बायकी हावभाव करतो ते दिग्दर्शक देवेंद्र गोयलाना दिसले व खटकले नाही का? ‘फकिरा’मध्ये ‘चल फकिरा’ हे गाणं नायक शशी कपूर नाही तर चरित्र अभिनेता डॅनी डेंझोपा गातो.

एकाच वेळी ‘अनारकली’वर दोन चित्रपट निघत होते. एकाला सी. रामचंद्रचे संगीत होते, दुसऱ्याला अनिल विश्वासचे. अनारकलीला भिंतीत चिनण्यात येते त्या प्रसंगाला सी. रामचंद्रने  लताला ‘ये जिंदगी उसीकी है’ हे गाणे दिले होते. त्याच प्रसंगासाठी अनिल विश्वासने लतालाच गाणे दिले होते – ‘अल्लाह भी है, मल्लाह भी है, कश्ती है के डूबी जाती है…’ काही कारणाने अनिलदांचा ‘अनारकली’ निघालाच नाही. त्यामुळे तिच्या तोंडी असलेले गाणे बेवारशी झाले. अखेर ते ‘मान’ (अजित-चित्रा साल 1954) या चित्रपटात भिकारणीच्या झोळीत पडले. जे शब्द (कवी असद भोपाली.) अनारकली म्हणणार होती ते हातात कटोरा घेऊन भिकारीण गायली. ‘समशीरे मुहोब्बत क्या कहिये, रुकती भी नही और चलती भी नही’ हे शब्द भिकारणीच्या तोंडी कसे वाटले असतील?

काही सुपरहिट गाणी मात्र दुय्यम म्हटल्या जाणाऱ्या कलाकारांसाठीच योजलेली असतात. उदा. ‘प्यासा’मधले जॉनी वॉकरच्या तोंडी असलेले ‘सर जो तेरा चकराये’ चंपीवालाच हे गाणं म्हणणार. हळुवार मनाचा कवी असलेला नायक गुरुदत्त ते कसं म्हणेल?

‘चुप चुप खडे हो’ (‘बडी बहेन’ – लता व प्रेमलता – हुस्नलाल भगतराम – साल 1949) हे तुफान गाजलेले गाणे चक्क दोन एक्स्ट्रांवर चित्रित केले गेले होते. बरोबरच आहे. लता नायिका – गायिका सुरय्याला प्लेबॅक कसा देणार? ‘अफसाना’मधले लताचे अजर गाणे ‘अभी तो मैं जवान हूँ’ पडद्यावर खलनायिका कुलदीप कौर गाते हे पचनी पडायला जरा जडच गेले होते. ‘मेहबूबा मेहबूबा’ म्हणायला ‘शोले’त त्यांनी जलाल आगाला का आणला असेल? ‘दिल्ली से आया भाई टिंगू’ (‘एक थी लडकी’) या कोरस गाण्यात संगीतकार विनोद (ऊर्फ एरिक रॉबर्टस्) व काही अनोळखी चेहरे दिसतात. ‘बेगुनाह’ चित्रपटातील ‘ऐ प्यासे दिल बेजुबाँ’ हे मुकेशचे गाणे पडद्यावर पियानो वाजवीत दस्तुरखुद्द संगीतकार जयकिशनने म्हटलेय. त्याला निर्माते व अन्य संबंधित मंडळींनी कदाचित पटवून दिले असेल की तूच म्हण. तू काय कोणापेक्षा कमी हँडसम आहेस…?

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या