कराडच्या शिवसैनिकाने दैनिक ‘सामना’सह अनेक आठवणींचे केले जतन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेनाप्रमुख, हिंदुह्रदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्यावर निस्सीम प्रेम करणारा कराड तालुक्यातील शिवसैनिकाने गेल्या पंचवीस वर्षातील दैनिक ‘सामना’ अंकाचे जिवापाड जतन केले आहे. शिवसेनाप्रमुखांच्या विचाराने प्रभावित होऊन पश्चिम महाराष्ट्रामध्ये शिवसेनाप्रमुखांच्या सभेला व शिवतीर्थावरील दसरा मेळाव्याला दरवर्षी आवर्जून उपस्थित राहणारा या शिवसैनिकांचे नाव महेश पाटील (रा. वरवडे, ता. कराड) असे आहे.

विरवडे (ता. कराड) येथे 1991 साली शिवसेनेची शाखा स्थापन करण्यात आली. या शाखेचे शिवसैनिक म्हणून महेश पाटील आजही अविरतपणे काम करीत आहेत. 1997 साली पुणे येथील सारसबा येथे शिवसेनाप्रमुखांची सभा आयोजित केली होती. या सभेला महेश पाटील पहिल्यांदा उपस्थित राहिले, यानंतर त्यांनी शिवसेनाप्रमुखांच्या प्रत्येक सभेला उपस्थिती लावलेली आहे. शिवतीर्थावरील दसरा मेळावा, शिवसेना वर्धापनदिन, शिवसेनाप्रमुखांची पुण्यतिथी याला ते आजही न चुकता प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित राहतात.

दैनिक सामना सुरू झाला तेव्हापासून महेश पाटील हे दैनिक “सामना”चे वाचक आहेत. तर दैनिक “सामना”चे अंक जतन करण्याचा त्यांना छंद आहे. प्रारंभीच्या पंधरा वर्षातील अंक त्यांनी जपून ठेवले होते मात्र वाळवी व पावसामुळे ते अंक खराब झाले. सध्या महेश पाटील यांच्याकडे जुलै 2005 पासून आज आखेर दैनिक “सामना” चे संपूर्ण अंक जतन करून ठेवलेले आहेत. नारायण राणे यांची शिवसेनेतून हकालपट्टी ते शिवसेनेचा मुख्यमंत्री अशा हेडलाईन असणारे दैनिक “सामना” चे अंक महेश पाटील यांनी जपून ठेवले आहेत.

saamana2

23 जानेवारी हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस. 2006 साली महेश पाटील यांनी कराडहून सरळ “मातोश्री” ला फोन करून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दूरध्वनीद्वारे वाढदिवसाच्या प्रत्यक्ष शुभेच्छा दिल्या होत्या. यावेळी त्यांनी टेलिफोन खात्याकडून एसटीडी कॉलदारे केलेल्या फोनचे बिल जपून ठेवले आहे. विशेष म्हणजे यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी प्रत्यक्ष फोन उचलून शुभेच्छा स्वीकारली असल्याची आठवण सद्गदीत होऊन महेश पाटील यांनी प्रस्तुत प्रतिनिधीला सांगितले.

23 जानेवारी 2012 रोजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा रुद्राक्षतुला केली होती. यामधील एक रुद्राक्ष महेश पाटील यांनी मिळवून आजही जपून ठेवलेला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची रुद्राक्षतुला केली, त्यावेळी 62 किलोच्या रुद्राक्षांची संख्या सुमारे 22 हजार 234 हजार अशी होती. शिवसेनाप्रमुखांचे आशीर्वाद रुपी हे रुद्राक्ष महाराष्ट्रातील शिवसैनिकांना वितरित करण्यात आले होते. यावेळी महेश पाटील यांनी मुंबई येथे जाऊन यामधील दोन रुद्राक्ष घेतले होते व ते आजही त्यांनी जपून ठेवले आहेत व गळ्यामध्ये परिधान केले आहेत.

saamana1

महेश पाटील यांनी शिवसेनाप्रमुखांचे दसरा मेळावा येथे झालेल्या भाषणाचे 1994 ते 2010 पर्यंतच्या सीडींची कॅसेट जपुन ठेवले आहेत. तर 2004 साली कराड येथे झालेल्या नाट्यसंमेलनावेळी श्रीनिवास प्रभुदेसाई यांनी “महेश अस्सल शिवसैनिक मोजपट्टी लावून बघा” असे व्यंगचित्र काढून दिलेले आहे.

saamana