
मिंधे गटाचे महाडचे आमदार भरत गोगावले यांच्या गुंडांची आज बहाद्दर शिवसैनिकांनी मस्ती उतरवली. प्रसिद्धीमाध्यमांशी पोपटपंची करताना गोगावले यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा अवमान केला होता. याविरोधात नॅपकिनवाल्या शेठचा महाडमधील शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरत कडकडीत निषेध केला. त्यामुळे तिळपापड झालेल्या मिंध्यांच्या गावगुंडांनी पोलिसांना हाताशी धरून छत्रपती शिवाजी महाराज चौकात हुल्लडबाजी करत शिवसैनिकांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र शिवसैनिकांनी जशास तसा जबाब देताच मिंध्यांच्या चिंधीचोरांची अक्षरशः भागमभाग झाली.
आदळआपट करूनही मंत्रीपद न मिळाल्याने राजकारणात पुरते हसे झालेले आमदार भरत गोगावले यांची पत्रकार नेहमीच फिरकी घेत असतात. गेल्या आठवडय़ात अधिवेशनासाठी नागपुरात गेलेल्या गोगावले यांना चॅनेलच्या एका पत्रकाराने प्रश्न विचारताच चिडलेल्या गोगावलेंनी शिवसेनाप्रमुखांविषयी अवमानकारक शब्द उच्चारला. याचा व्हिडीओ व्हायरल होताच संपूर्ण राज्यातून टीकेची झोड उठली. महाडमध्येही याचे संतप्त पडसाद आज उमटले. शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपजिल्हाप्रमुख पद्माकर मोरे, जिल्हा युवाधिकारी बंटी पोटपह्डे, आशीष फळसकर, तालुकाप्रमुख राजेंद्र कोरपे, शहरप्रमुख सुदेश कळमकर यांच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन करण्यात आले. मात्र पोलिसांना हाताशी धरून गोगावलेंच्या गुंडांनी हा निषेध मोर्चा अडवण्याचा प्रयत्न केला. यामुळे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रचंड तणाव निर्माण झाला, परंतु शिवसैनिकांनी नॅपकिन शेठचा धिक्कार करत जशास तसे उत्तर दिले. त्यामुळे गोगावलेंच्या कार्यकर्त्यांची पळापळ झाली.
144 ची नोटीस मिंधे गटाला का बजावली नाही?
गोगावले यांचा निषेध करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसैनिक जमणार असल्याची माहिती कळताच मिंधे गटाने राजकीय दबाव टाकत शिवसैनिकांना 144 ची नोटीस बजावली. मात्र ही झुंडशाही झुगारून कडकडीत निषेध करण्यासाठी आलेल्या शेकडो शिवसैनिकांना अडवण्यासाठी भरत गोगावलेंचे गावगुंड त्याआधीच चौकात फळी करून उभे होते, पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतल्याने संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी मिंध्यांचा धिक्कार करत जमावबंदीची नोटीस मिंधे गटाला का बजावली नाही, असा सवाल केला.
महाराजांचा अवमान करणाऱयांनी माफी मागावी
चौकात जमलेल्या शिवसैनिकांनी आंदोलनापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाला पुष्पहार अर्पण करण्याचा प्रयत्न केला. मात्र याला मिंधेंच्या गुंडांनी विरोध करत हुल्लडबाजी केली. त्यामुळे संतप्त झालेल्या शिवसेनेच्या रणरागिणींनी महाराजांना पुष्पहार अर्पण करायला कोण अडवतो तेच बघतो, असे आव्हान दिले. यावेळी प्रचंड तणाव निर्माण झाला. अखेर पोलिसांनी विनंती करत एका महिला पोलिसांच्या हस्ते महाराजांना पुष्पहार अर्पण करून हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, महाराजांना पुष्पहार अर्पण करण्यास अटकाव करणाऱया मिंध्यांविरोधात महाडकरांनी तीव्र संताप व्यक्त केला असून छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱया मिंधे गटाने जाहीर माफी मागावी अशी मागणी केली आहे.






















































