
दुर्गेश आखाडे । रत्नागिरी
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या विविध विषय समित्यांच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत प्रचंड संख्याबळाच्या जोरावर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. बुधवारी झालेल्या निवडणुकीत शिक्षण आणि अर्थसभापती पदी सहदेव बेटकर, बांधकाम आणि आरोग्य सभापतीपदी विनोद झगडे, महिला आणि बालकल्याण सभापती पदी साधना साळवी, समाजकल्याण सभापती पदी प्रकाश रसाळ यांची बिनविरोध निवड झाली. विजयानंतर जि प.च्या आवारात ढोल ताशांच्या गजरात जल्लोष करण्यात आला.

रत्नागिरी जि.प.च्या विषय समित्यांच्या सभापतीपदासाठी पक्षाने दिलेली मुदत संपल्यानंतर सर्व सभापतींनी राजीनामे दिले. त्यामुळे रिक्त झालेल्या सभापतीपदांसाठी बुधवारी छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात निवडणूक प्रक्रिया पार पडली. शिवसेनेकडून शिक्षण आणि अर्थसभापती पदासाठी संगमेश्वर तालुक्यातील धामापूर जि.प.गटातून निवडून आलेले सहदेव बेटकर, बांधकाम आणि आरोग्य समिती सभापती पदासाठी चिपळूण तालुक्यातील अलोरे जि.प.गटातून निवडून आलेले विनोद झगडे, रत्नागिरी तालुक्यातील कोतवडे जि.प.गटातून निवडून आलेल्या साधना साळवी यांना महिला आणि बाल कल्याण सभापतीपदाची आणि नाचणे जि.प.गटातून निवडून आलेल्या प्रकाश रसाळ यांना समाजकल्याण सभापतीपदाची उमेदवारी देण्यात आली. हातखंबा जि.प.गटातून निवडून आलेल्या परुराम कदम यांनी समाजकल्याण सभापतीपदासाठी निवडणूक अर्ज भरला होता. त्यानंतर त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. निवडणूक निर्णय अधिकारी अमित शेडगे यांनी सभापती पदाचे चारही उमेदवार बिनविरोध विजयी झाल्याचे घोषित केले. विजयानंतर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडीक आणि जि़प़अध्यक्षा स्वरुपा साळवी यांनी विजयी सभापतींचे अभिनंदन केले. यावेळी उपजिल्हाप्रमुख शशिकांत चाळके, महेश म्हाप, गटनेते उदय बने, तालुकाप्रमुख प्रदिप साळवी, प्रमोद पवार, माजी बांधकाम सभापती दत्ता कदम, माजी सभापती दिपक नागले, अरुण कदम, चारुता कामतेकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.


























































