
सामना प्रतिनिधी । मुंबई
मुंबई महानगरपालिकेच्या के पूर्व विभागातील मौजे मरोळ येथील दिलेली 50 टक्के जमीन सहारा पार्कसाठी राखीव ठेवावी व उर्वरित 50 टक्के शिल्लक जमिनीवरील आरक्षण रद्द करून त्याचा वापर मालकाने हॉटेलसाठी करावा. मात्र हॉटेलचा विकास करण्यापूर्वी पार्क विकसित करून सर्वसामान्यांसाठी खुले करावे अशी अट घालण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत तारांकित प्रश्नावरील लेखी उत्तरात दिली.
मौजे मरोळ येथील नगर भूमापन क्रमांक 1498, 1498(ए), 1498(बी), 1498(सी) व 1498(डी) या भूखंडावरील पंचतारांकित हॉटेलच्या बांधकामाबाबत शिवसेना आमदार सुनील राऊत यांनी प्रश्न विचारला होता. या भूखंडावरील विकासाबाबत राज्य सरकारने दिलेल्या निर्देशाचे विकासकाने पालन केले नसून सर्व नियमांचे उल्लंघन करून या भूखंडावर केलेल्या पंचतारांकित हॉटेलच्या बांधकामाच्या चौकशीबाबत हा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर सदर मंजूर विकास योजनेत जमीन मालकाच्या ताब्यात असलेल्या जमिनीपैकी 50 टक्के जमीन मौजे सहार पार्ककरिता आरक्षित ठेवावी, त्याचे भूसंपादन करू नये. उर्वरित 50 टक्के शिल्लक जमिनीवरील आरक्षण रद्द करावे व त्याचा वापर जमीन मालकाने फक्त हॉटेलसाठी करावा. मालकाने हॉटेलचा विकास करण्यापूर्वी सदर पार्क विकसित करावे. त्याची देखभाल करावी व मर्यादित वेळेत सर्वसामान्यांसाठी खुले करावे या अटीसापेक्ष सदर जमीन वाणिज्य (सी-1) वापर विभागामध्ये त्याचा समावेश करण्याची अट आहे असे लेखी उत्तरात नमूद केले आहे.
सभागृहाची दिशाभूल
यासंदर्भात शिवसेना आमदार सुनील राऊत यांच्याशी संपर्क साधला असला ते म्हणाले की, उद्यान विकसित करून मगच हॉटेल विकसित करावे अशी अट होती, पण आतापर्यंत विकासकाने कोणतेच उद्यान विकसित केलेले नाही. अटीचे उल्लंघन केले आहे. यासंदर्भात महापालिकेने चुकीचे उत्तर देऊन सभागृहाची दिशाभूल केली आहे. हॉटेल मालकाला पाठीशी घालून व चुकीचे उत्तर देऊन सभागृहाची दिशाभूल करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई झालीच पाहिजे व त्या हॉटेलवरसुद्धा कारवाई झाली पाहिजे, अशी मागणीही सुनील राऊत यांनी केली.



























































