नीलम गोऱ्हे, कायंदे, बाजोरिया यांच्या अपात्रतेबाबत तातडीने निर्णय घ्या! शिवसेनेचे विधिमंडळ सचिवांना पत्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गद्दारी करून मिंधे गटात सामील झालेले विधान परिषदेचे आमदार डॉ. नीलम गोऱहे, मनीषा कायंदे आणि विप्लव बाजोरिया यांच्या अपात्रतेबाबत लवकरात लवकर निर्णय घ्या, असे स्मरणपत्र (रिमाईंडर) आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून विधिमंडळ सचिवालयाला देण्यात आले.

गोऱहे, कायंदे आणि बाजोरिया या तीनही आमदारांनी केलेले पक्षांतर कायद्याच्या चौकटीत बसत नसल्याचा आरोप करत या तिघांनाही अपात्र घोषित करा अशी मागणी करणारे पत्र शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने गेल्या जुलै महिन्यात विधिमंडळ सचिवांना दिले होते, मात्र अद्याप त्यावर काहीच निर्णय झालेला नाही. त्यामुळे पक्षाच्या वतीने आज सचिवांना पुन्हा स्मरणपत्र देण्यात आले अशी माहिती आमदार अॅड. अनिल परब यांनी दिली.

…अन्यथा न्यायालयात जाऊ ः अनिल परब
16 आमदारांच्या अपात्रतेबाबत जसे वेळकाढू धोरण अवलंबले गेले तसेच या तीन आमदारांच्या अपात्रतेबाबत केले जात आहे. आज स्मरणपत्र दिले आहे, पण लवकरात लवकर निर्णय घेतला गेला नाही तर न्यायालयात जाऊ, असा इशारा अनिल परब यांनी दिला आहे.