
सामना प्रतिनिधी । वसमत
वसमत येथे तहसील कार्यालयात संजय गांधी व श्रावणबाळ निराधार योजनेची बैठक समितीचे अध्यक्ष आमदार डॉ. जयप्रकाश मुंदडा यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीमध्ये निराधारांना अनुदान देण्यासाठी 255 प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. यासोबतच तालुक्यातील विविध प्रलंबीत विकासकामांचा आढावा घेऊन कामांना गती देण्याच्या सुचना आमदार डॉ. मुंदडा यांनी केल्या.
वसमत तालुक्यामध्ये तसेच शहरातील निराधार नागरिकांना आधार देण्यासाठी आमदार डॉ. जयप्रकाश मुंदडा हे धावुन आले असुन वेगवेगळ्या त्रुटीमध्ये अडकलेल्या प्रस्तावांना मंजुरी देण्यासाठी वसमतच्या तहसील कार्यालयात विशेष बैठक घेण्यात आली. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रविण फुलारी, वसमतच्या तहसीलदार ज्योती पवार व समिती सदस्य बाबुराव सोनटक्के, तालीकोंडलवार यांची उपस्थिती होती. या बैठकीमध्ये श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी योजनेचे तसेच संजय गांधी निराधार योजनेचे एकुण 418 प्रस्ताव सादर करण्यात आले होते. त्यापैकी श्रावणबाळ योजनेचे 170 तर संजय गांधी निराधार योजनेचे 85 अर्ज मंजूर झाले.
दरम्यान, त्रुटीअभावी व कागदपत्रांच्या अपुर्ततेमुळे शंभरच्यावर प्रस्ताव प्रलंबीत राहिले असून कागदपत्रांची पुर्तता झाल्यावर या प्रस्तावांना देखील तातडीने मंजुरी देण्यात यावी, असे निर्देश माजी मंत्री आमदार डॉ. जयप्रकाश मुंदडा यांनी दिले. आमदार जयप्रकाश मुंदडा यानी वसमत तालुक्यातील विविध कामांचा आढावा घेतला. दिव्यांगासाठीचा निधी व त्याच्या विविध योजनेचा आढावा घेतला आतापर्यंत किती निधी उपलब्ध झाला व तो दिव्यागांचा कोणत्या योजनांवर खर्च होणार आहे या बाबत गटविकास अधिकारी व नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्या कडून आढावा घेतला आहे. वसमत तालुक्यातील ढगफुटी बाबत अनेक गावांना अनुदान मिळण्यासाठी संदर्भात तसेच बोंडअळी बाबत अनुदान वितरीत करण्याबाबतही प्रशासनाला सुचना देऊन माहिती घेतली.
























































