
जोगेश्वरी (पूर्व) हरीनगर-शिवाजीनगर एसआरए घोटाळा प्रकरणाची दखल घेत मूळ मालकांच्या घरांमध्ये अनधिकृतरित्या राहत असलेल्या सुमारे 59 सदनिकांमधील अनधिकृत रहिवाशांविरोधात झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने निष्कासनाची कारवाई सुरू केली आहे. शिवसेनेने केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून त्यामुळे 122 रहिवाशांना त्यांच्या हक्काची घरे मिळणार आहेत.
अंधेरी (पूर्व) विधानसभा क्षेत्राचे आमदार रमेश लटके यांनी हरीनगर-शिवाजीनगर येथील एसआरए सदनिका वाटपातील घोटाळ्याप्रश्नी मागील सरकारमधील तत्कालीन गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. मूळ पात्र झोपडीधारकांना ताबा न देता योजनेबाहेरील रहिवाशांना विकासकाने ताबा दिल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने येथील वाटप करण्यात आलेल्या सदनिकांचे नव्याने तपासणी करण्याचे आदेश वायकर यांनी दिले. त्यानुसार 10 मे 2018 व 2 फेब्रुवारी 2019 रोजी सहकारी कक्षाकडून पुनर्वसन योजनेतील एकूण 345 सदनिकांची तपासणी केली. त्यामुळे पुनर्वसन योजनेतील एपुण 122 वाटप न झालेल्या परंतु सद्यस्थितीला या सदनिकांमध्ये अन्य रहिवाशी राहत असल्याचे आढळून आले. त्यानुसार या सदनिका तात्काळ रिक्त करण्याचे निर्देश सहनिबंधक यांनी एसआरएच्या संबंधित अधिकाऱयांना दिले. त्यानुसार एसआरएमधील उपजिल्हाधिकारी यांच्याकडून निष्कासनाची कारवाई सुरू करण्यात आली आहे. सध्या निष्कासनाची कारवाई सुरू असून ती पूर्ण झाल्यावर पात्र झोपडीधारकांना सदनिकांचे वाटप करण्यात येईल, अशी लेखी माहिती सहनिबंधक यांनी वायकर यांना दिली आहे.































































