मुख्यमंत्र्यांच्या सुशोभीकरणाच्या आदेशावरून आदित्य ठाकरे यांचा महापालिकेला सवाल, मागितला खुलासा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात मुंबईच्या सुशोभिकरणावर सतराशे कोटींचा खर्च दाखवण्यात आला आहे. त्यावरून शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिकेच्या प्रशासकांना धारेवर धरले होते. दरम्यान आजही आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरून पुन्हा एकदा राज्य सरकार व पालिका प्रशासनावर निशाणा साधला आहे.

वांद्रे पश्चिमेचे नगरसेवक राजा राहेबार खान यांनी रविवारी लिलावती रुग्णालयाजवळ डिव्हायडरचे काम सुरू असल्याचा व्हिडीओ त्यांच्या ट्विटरवर शेअर केला. या व्हिडीओसोबत त्यांनी महानगरपालिका जनतेचा पैसा कसा वाय घालवतेय ते दाखवले. ”अतिशय व्यवस्थित अवस्थेत असलेला लिलावती रुग्णालयासमोरील डिव्हायडर तोडून नवीन डिव्हायडर बांधण्याचे काम सध्या सुरू आहे. महानरपालिकेकडून जनतेचा पैसा वाया घालवला जात आहे. मी दिलेल्या व्हिडीओत तुम्ही जुना डिव्हायडर किती मजबूत स्थितीत आहे ते पाहू शकता” असे ट्विट खान यांनी केले आहे.

राजा राहेबार खान यांनी ट्विट केलेला व्हिडीओ आदित्य ठाकरे यांनी शेअर केला असून त्यावरून त्यांनी राज्य सरकार व पालिका प्रशासनाला सवाल केला आहे. ”महापालिकेने हे काय चालू आहे त्याचे स्पष्टीकरण द्यावे. हा डिव्हायडर महिनाभराआधीच रंगवण्यात आलेला होता व अत्यंत चांगल्या स्थितीत होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार मुंबईकरांच्या सतराशे कोटीं रुपयांतून जे सुशोभिकरणाचे काम पारदर्शी प्रशासनाने कंत्राटदार धार्जिन्यांना दिले आहे, ते हेच का? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी या ट्विटमधून केला आहे.

शनिवारी मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी अर्थसंकल्प सादर केला. त्या अर्थसंकल्पातील आकड्यावरून शनिवारी पत्रकार परिषद घेत आदित्य ठाकरे यांनी पालिका प्रशासनावर निशाणा साधला होता. कोणताही नवा प्रकल्प नसताना अर्थसंकल्प फुगवून 50 हजार कोटींच्या वर नेणाऱ्या मुंबई महापालिकेच्या प्रशासकांना आदित्य ठाकरे यांनी धारेवर धरले. हा अर्थसंकल्प मुंबईकरांचा नसून वर्षा बंगल्यातून छापून आलेला कंत्राटदार मित्रांसाठीचा अर्थसंकल्प आहे, हे स्पष्ट दिसत आहे, अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी हल्ला चढवला होता.