
सांगली जिल्ह्यातील हृदयविकार असलेल्या 40 बालकांवर मुंबईतील एसआरसीसी रुग्णालयात पुढील दोन दिवस हृदय शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. या बालकांची आणि त्यांच्या पालकांची पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज रुग्णालयात जाऊन भेट घेतली.
शस्त्रक्रिया करण्यात येणाऱया बालकांच्या पालकांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे म्हणाले, डॉक्टरांना आपण देव मानतो. कोविडच्या काळात वैद्यकीय क्षेत्रातील सर्वच घटक आपले योगदान देऊन समाजसेवा करीत आहेत. या काळात काही डॉक्टर कोविड व्यतिरिक्त इतर आजार असणाऱया व्यक्तींवर उपचार करण्यासाठी गावोगावी जाऊन सेवा देत आहेत. त्याचाच परिणाम म्हणून आज सांगली जिह्यातील या बालकांना असलेला आजार वेळेत लक्षात आल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली जात आहे. यासाठी प्रयत्न केलेल्या सर्व घटकांना यावेळी आदित्य ठाकरे यांनी धन्यवाद दिले.
यावेळी शिवसेना उपनेते, सांगली जिल्हा संपर्कप्रमुख नितीन बानुगडे-पाटील, जिल्हाप्रमुख आनंद पवार, संजय विभूते, युवासेना जिल्हा युवा अधिकारी सचिन कांबळे, डॉ. किशोर ठाणेकर, वाळवा तालुकाप्रमुख सागर मलगुंडे, राष्ट्रीय बाल स्वास्थ्यचे डॉ. प्रमोद चौधरी, सनत पाटील आदी उपस्थित होते.
शिवसेनेचा बालकांना मदतीचा हात
– राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत अंगणवाडी आणि शाळेतील बालकांच्या आरोग्य तपासणीचा कार्यक्रम राबवला जातो. मागील मार्चपासून राज्यात कोरोना आपत्ती व सद्यःस्थितीत महापुराची परिस्थिती यामुळे अंगणवाडी व शाळा बंद असल्याने सदर योजनेअंतर्गत नियुक्त पथकांनी सांगली जिल्ह्यातील बालकांची गावागावात शिबिरांद्वारे तपासणी केली असता 40 बालकांवर हृदय शस्त्रक्रिया आवश्यक असल्याचे निदर्शनास आले. या शस्त्रक्रियांकरिता अंदाजे दोन कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित असून सदरची सर्व बालके ही गरीब परिवारातील असल्याने सदरच्या शस्त्रक्रिया पूर्ण करणे त्यांच्या पालकांना अवघड होते. त्यासाठी सांगली जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय तसेच सांगली जिल्हा शिवसेना यांच्या माध्यमातून राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत उपलब्ध होणारा निधी, शिवसेना वैद्यकीय सहायता कक्ष आणि विविध सामाजिक संस्थांच्या सहकार्याने या बालकांवर मुंबई येथील एसआरसीसी रुग्णालयात मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.


































































