श्रीरामकुंडातील दुर्गंधीयुक्त गाळात उतरून शिवसेनेचे तीव्र आंदोलन, पवित्र गोदावरीची दुर्दशा करणाऱ्या महापालिकेचा निषेध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महापालिकेसह संबंधित यंत्रणांनी कुंभमेळा विकासकामांच्या नावाखाली पवित्र गोदावरी नदीची दयनीय अवस्था केली आहे, नदीपात्रात ड्रेनेजचे पाणी सोडले आहे. अस्थीविसर्जनाच्या ठिकाणी अत्यंत अस्वच्छता आहे, याच्या निषेधार्थ सोमवारी शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली. श्रीरामकुंडातील दुर्गंधीयुक्त गाळात उतरून प्रशासनाविरोधात निदर्शने केली, अधिकाऱ्यांना आंदोलन स्थळी बोलावून धारेवर धरले. आठ दिवसांत स्वच्छता केली नाही तर महापालिकेवर आंदोलन करू, असा इशारा शिवसेना जिल्हा संघटक व महापालिका गटनेते केशव पोरजे यांनी दिला आहे.

देशभरातून लाखो भाविक गोदावरी नदीत स्नानासाठी व दर्शनासाठी येतात. मात्र, नदीपात्रात ड्रेनेजचे पाणी सोडले जात आहे. अस्थी विसर्जनाच्या जागेत अस्वच्छ पाणी आहे. याबद्दल भाविकांकडून प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे.

या आंदोलनात जिल्हा संघटक केशव पोरजे, महानगरप्रमुख प्रथमेश गीते, नगरसेवक शैलेश ढगे, मुरलीधर भामरे, योगेश गाडेकर, योगेश भोर, महिला आघाडी जिल्हा संघटक स्वाती पाटील, नगरसेविका मंगला आढाव, सीमा पवार, वैशाली दाणी, आदी सहभागी झाले होते.

 आदित्य ठाकरे यांचा जनआंदोलनाचा इशारा, पालिकेला सात दिवसांचा अल्टिमेटम

सिंहस्थ कुंभमेळा अवघ्या काही महिन्यांकर आला असतानाही भाजपा सरकार आणि प्रशासनाला नाशिकची कोणतीच काळजी नाही. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पवित्र गोदामाईत आज थेट गटाराचं पाणी सोडलं जातंय. हा हिंदूंच्या आस्थेचा आणि नाशिककरांच्या अस्मितेचा अपमान आहे. नदीच्या स्वच्छतेचा देखील तितकाच गंभीर प्रश्न आहे. यंत्रणा मात्र डोळे मिटून बसली आहे. याविरोधात आज नाशिकमधील शिवसैनिकांनी आणि नगरसेककांनी थेट पाण्यात उतरून प्रशासनाला जाब विचारला. येत्या 7 दिवसांत गोदावरीतलं हे प्रदूषित पाणी बंद झालं नाही, तर संपूर्ण नाशिककरांना सोबत घेऊन महापालिकेला रस्त्याकर उतरवणारे जनआंदोलन केले जाईल, असा इशारा शिवसेना नेते, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी एक्स पोस्टच्या माध्यमातून दिला.