एकच मैदान, एकच पक्ष, एकच नेता; शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची शिवतीर्थावर जय्यत तयारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या सहा दशकांपासूनची वैभवशाली परंपरा असलेला शिवसेनेचा दसरा मेळावा यंदाही त्याच दिमाखात, त्याच उत्साहात, लाखो शिवसैनिकांच्या साक्षीने होणार आहे. एकच मैदान, एकच पक्ष, एकच नेता असे बीरुद असलेल्या या मेळाव्याची जय्यत तयारी सध्या शिवतीर्थावर सुरू आहे. या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार असून महाराष्ट्रासह ‘इंडिया’चे लक्ष या मेळाव्याकडे लागले आहे.

शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला महाराष्ट्राच्या कानाकोपऱयातून आणि देशभरातून लाखो शिवसैनिक मुंबईत दाखल होतात. शिवतीर्थावर विराट जनसागरच उसळतो. शिवसैनिकांसाठी हा मेळावा म्हणजे एक पर्वणीच असते. ओजस्वी विचारांचे सोने लुटण्याचा योग यानिमित्ताने जुळून येतो. त्यामुळेच मेळाव्याबाबत उत्सुकता शिगेला पोहचली असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कोणता नवा विचार देतात, याकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत. सध्या मेळाव्याची जय्यत तयारी सुरू आहे. शिवतीर्थावर भव्यदिव्य आणि आकर्षक व्यासपीठ उभारण्यात येत आहे.

– शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह सर्व शिवसेना नेते, उपनेते, खासदार, आमदार, नगरसेवक, सर्व जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, महिला आघाडीच्या पदाधिकारी या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत.

वाजतगाजत, गुलाल उधळत या…

दसरा मेळाव्याला वाजतगाजत, गुलाल उधळत आणि शिस्तीचे दर्शन घडवत जल्लोषात विचारांचे सोने लुटण्यासाठी शिवतीर्थावर या, असे आवाहन आधीच उद्धव ठाकरे यांनी केलेले आहे. सायंकाळी सहा वाजता मेळावा सुरू होणार आहे.

उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार

भाजपची हुकूमशाही प्रवृत्ती, महाराष्ट्रात बसलेले घटनाबाह्य सरकार, आमदार अपात्रतेवर विधानसभा अध्यक्षांचा वेळकाढूपणा, सरकारी रुग्णालयांतील मृत्यूचे तांडव, वाढती महागाई, बेरोजगारी, महिला सुरक्षा, मराठा आरक्षण, ड्रग्ज तस्करांना असलेला सत्ताधाऱयांचा वरदहस्त, भीषण दुष्काळाचे सावट, शेतकरी आत्महत्या अशा कळीच्या मुद्दय़ांवर उद्धव ठाकरे कसा आसुड ओढतात तसेच आगामी लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, नगरपंचायत आणि महापालिका निवडणुकांबाबत काय संदेश देतात याकडे तमाम शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे.

महापालिकेचे कर्मचारी मैदानात

शिवतीर्थावरील दसरा मेळाव्याला मुंबई महापालिकेकडून परवानगी देण्यात आली आहे. याबाबत शिवसेनेकडून जी उत्तर विभागाकडे रीतसर अर्ज करण्यात आला होता. तो अर्ज स्वीकारून काही अटींसह दसरा मेळाव्याला अनुमती देण्यात आली. त्यानंतर पालिकेकडून पुढच्या आवश्यक बाबींची पूर्तता केली जात आहे. पालिकेच्या कर्मचाऱयांनी आज मैदानात उतरत कटरच्या सहाय्याने गवत कापणीचे काम मार्गी लावले.

सोनेवाटप, शस्त्रपूजन आणि रावण दहन

शिवसेनेचा दसरा मेळावा हा सांस्कृतिक सोहळाही असतो. महाराष्ट्राची संस्कृती, परंपरेचे दर्शन येथे घडणार असून सोने वाटप, शस्त्रपूजनानंतर रावण दहन केले जाणार आहे.