बिबटय़ांचा वावर रोखण्यासाठी संरक्षक भिंत उभारा, शिवसेनेची मागणी

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगत संरक्षक भिंत नसल्यामुळे दिंडोशी विधानसभा क्षेत्रात येणाऱया मालाड पूर्व येथील नागरी परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून बिबटय़ांचा मुक्त संचार सुरू आहे. त्यामुळे या परिसरातील कुटुंबांच्या जिवाला धोका असतोच, पण परिसरातील कुटुंबे नेहमीच दहशतीखाली असतात. बिबटय़ांचा वावर रोखण्यासाठी उद्यानाजवळ संरक्षण भिंत उभारा, त्याचबरोबर उद्यानाजवळील गृहनिर्माण संस्थांना पिंजरे लावण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी शिवसेना मुख्य प्रतोद, शिवसेना नेते, आमदार सुनील प्रभू यांनी मुख्य वनसंरक्षक अधिकाऱयांकडे केली आहे.

बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग हा दिंडोशी विधानसभा परिसराला लागून आहे. या परिसरात 77 सहकारी गृहनिर्माण संस्था आहेत. गेल्या काही वर्षांपासून या परिसरात आणि इमारतींच्या टेरेसवर बिबटय़ांचा वारंवार मुक्त संचार पाहायला मिळाला आहे. त्यामुळे रहिवाशांच्या जिवाला धोका निर्माण झाला असून त्याबाबतच्या तक्रारी शिवसेना नेते सुनील प्रभू यांच्याकडे केल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर सुनील प्रभू यांच्याकडून याबाबत मुख्य वनसंरक्षकांकडे पाठपुरावा केला जात आहे.

पिंजऱयासंबंधी जाचक अटी शिथिल करा!

गृहनिर्माण संस्थांना परिसरातील बिबटय़ांना पकडण्यासाठी पिंजरे लावण्यासाठी वन विभागाकडून परवानगी घ्यावी लागते. प्रस्ताव दिल्यानंतर हा प्रस्ताव वन विभागाकडे पाठवला जातो. वन विभागाकडून तो प्रस्ताव सरकारच्या मंजुरीसाठी नागपूर वन विभागाकडे पाठवला जातो. या सर्व जाचक अटींमुळे अनेक वेळा पाठपुरावा करूनही परवानगी मिळत नाही. त्यामुळे या जाचक अटी शिथिल करा, अशी मागणीही प्रभू यांनी केली आहे.

अभ्यास गट समितीची स्थापना करा

दिंडोशी विधानसभा क्षेत्रातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या सीमेजवळील राहणाऱया कुटुंबांना संरक्षण देण्यासाठी सरकारने रहिवाशांच्या सुरक्षेसाठी पिंजरा लावणे, संरक्षण भिंतीचे काम तातडीने पूर्ण करणे, शीघ्रगती पथक आणि रहिवाशांच्या संरक्षणासाठी अभ्यास गट समिती नियुक्ती करून तिच्या शिफारशीनुसार तातडीने कार्यवाही करण्यासाठी संबंधित अधिकारी वर्गाला आदेश द्यावेत, अशी मागणी सुनील प्रभू यांनी मुख्य वन संरक्षक अधिकाऱयांकडे केली आहे.