देशातील हुकूमशाहीची वळवळ गाडून टाका – उद्धव ठाकरे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशातील हुकूमशाहीची वळवळ आत्ताच गाडली पाहिजे, आत्ता नाही तर कधीच नाही, अन्यथा आपल्या भगव्याला आणि देशप्रेमाला काहीच अर्थ राहणार नाही, असे खणखणीत आवाहन शिवसेना (उद्भव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी केले.

उत्तर- मध्य मुंबई भाजप सचिव सुधीर खातू यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्याप्रसंगी उद्धव ठाकरे यांनी त्यांना संबोधित केले. राजकारणात साधारणपणे पक्षप्रवेशाचा प्रवाह विरोधी पक्षाकडून सत्ताधारी पक्षाकडे असतो, पण सुधीर खातू यांनी तो प्रवाह उलटा फिरवून सत्ताधारी पक्षातून देशप्रेमी, हिंदुत्ववादी पक्षाकडे प्रवाह सुरू केला, असे उद्धव ठाकरे म्हणाले. महाराष्ट्रातला हिंदू, मराठी आणि जे जे लोकशाहीप्रेमी आहेत ते एकवटलेच पाहिजेत, असे ते पुढे म्हणाले.

खातू यांच्यासह आलेल्या कार्यकर्त्यांनी आपल्यासोबत शिवसेनेची निशाणी असलेल्या मशालीचे चिन्ह असलेले भगवे झेंडेही आणले होते. ते झेंडे पाहून उद्धव ठाकरे म्हणाले की, आज तुमच्या हाती भगवा आहे आणि त्यावर मशाल चिन्ह आहे, पण हा भगवा म्हणजेच मशाल आहे. हीच मशाल आणि हाच भगवा देशाला दिशा दाखवणारच आहे, शिवाय आपल्यावर होणाऱ्या अन्याय, अत्याचारालाही जाळून टाकणार आहे, अशी मला खात्री आहे, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणताच ‘मातोश्री’ चा परिसर ‘शिवसेना झिंदाबाद’च्या घोषणांनी दुमदुमला.