शिवतीर्थावरील मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा नियमांनुसारच! मुंबई महापालिकेचे हायकोर्टात प्रतिज्ञापत्र

370

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. याप्रसंगी कोणत्याही नियमांचे उल्लंघन झालेले नाही. हा सोहळा नियमानुसारच पार पडला असा ठाम युक्तिवाद आज पालिका प्रशासनाच्या वतीने हायकोर्टात करण्यात आला.  प्रशासनाच्या वतीने तसे प्रतिज्ञापत्रच न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या खंडपीठासमोर सादर केले.

 दादरमधील शिवाजी पार्क (शिवतीर्थ) हा परिसर सायलेन्स झोन म्हणून निश्चित करण्यात आला आहे 2010 साली तसे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे मैदानावर इतर कोणत्याही कार्यक्रमांना परवानगी देण्यात येऊ नये अशी मागणी करत विकॉम ट्रस्ट या संस्थेच्या वतीने हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे

पालिकेची बाजू काय?

पालिकेची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील ऍड. अनिल साखरे यांनी कोर्टाला सांगितले की, राज्य सरकार आणि पालिकेने वर्षातील 45 दिवस शिवाजी पार्क हे मैदान सार्वजनिक कार्यक्रमांसाठी राखून ठेवले आहेत. त्यापैकी राखीव म्हणून ठेवण्यात आलेल्या दिवसांमध्ये हा शपथविधी सोहळा घेण्यात आला. सरकारने पालिकेकडे शपथविधीकरिता 27 आणि 28 नोव्हेंबर यापैकी एका दिवसाच्या परवानगीसाठी प्रस्ताव पाठवला होता, मात्र राखीव दिवसांमध्ये हे दोन दिवस मोडत नसल्याने प्रशासनाने तो प्रस्ताव राज्य सरकारकडे परत पाठवला. त्यानंतर राज्य सरकारने नगरविकासच्या मुख्य सचिवांकडून तारीख संमत करूनच शपथविधीला परवानगी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या