शिवम बँकेच्या गैरव्यवहाराचे पैसे भाजपच्या पृथ्वीराज देशमुख यांच्या शुगर फॅक्टरीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजीच्या शिकम सहकारी बँकेत बनावट कागदपत्रे तयार करून गैरव्यवहार करण्यात आला आणि तो पैसा भाजप आमदार पृथ्वीराज देशमुख संचालक असलेल्या साखर कारखान्यासाठी गेला असल्याची माहिती सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी गुरुवारी विधानसभेत दिली. चौकशीअंती जबाबदारी निश्चित करून कारवाई केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

आमदार सुनील राऊत आणि आमदार सदा सरवणवर यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी या बँकेत 25 कोटी 40 लाख 40 हजार 799 रुपयांचा गैरव्यवहार झाला. तो बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकांनीच केला असल्याची माहिती त्यांनी दिली. शिवम सहकारी बँकेच्या 2017-18 या आर्थिक वर्षांच्या लेखापरीक्षण अहवालावरून हा गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट झाले होते. वसंतराव नाईक भटक्या विमुक्त जमाती सहकारी सूतगिरणीच्या नावे बनावट खाते निर्माण करून 24.42 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे निदर्शनास आले आहे. हे बनावट कर्ज घेऊन व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज देशमुख यांच्याच जे. के. शुगर या कारखान्यात गेले असल्याचे बाळासाहेब पाटील यांनी सांगितले. यात अभिजित घोरपडे, सुरेंद्र चौघुले, शिवाजी शेळके यांच्यासह 37 आरोपी सहभागी आहेत. त्यांच्यावर 12 नोव्हेंबर 2019 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे ते म्हणाले.

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 च्या कलम 88 अन्वये संस्थेत झालेल्या नुकसानीची जबाबदारी निश्चित करण्यासाठी सहकार आयुक्त कार्यालयाकडून 19 डिसेंबर 2019 रोजी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. चौकशीत जे दोषी आढळतील त्यानुसार जबाबदारी निश्चित करण्यात येईल, असे मंत्री पाटील यांनी सांगितले.

एसआयटी नेमा – सुनील प्रभू
यावेळी आमदार सुनील प्रभू यांनी शिवम सहकारी बँकेतून सूतगिरणीसाठी घेतलेले कर्ज नेमके कुठे गेले याचा शोध घेण्यात यावा. त्याचप्रमाणे यामध्ये गुंतलेल्या व्यक्तींची चौकशी करण्यात यावी. यासाठी एसआयटी नेमा, अशी मागणी सुनील प्रभू यांनी केली. यावेळी यावेळी संग्राम थोपटे, भाजप आमदार जयकुमार गोरे, प्रशांत बंब यांनीही उपप्रश्न उपस्थित केले.