‘हला हूप’ची राणी, गिरगावच्या शिवानीची ‘पॅशन’ ते ‘प्रोफेशन’ वाटचाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘हुला हूप’ बद्दल कधी ऐकलंय का… रिंग घ्यायची आणि कमरेभोवती गर्रकन गोल फिरवायची. फिरवतच रहायची. त्यासाठी एकप्रकारचे कौशल्य लागते. सगळ्यांना ते जमत नाही., पण प्रशिक्षण घेतल्यावर आणि सराव केल्यावर नक्कीच जमू शकते. गिरगावची शिवानी धोपावकर ही 24 वर्षांची मुलगी तर ‘हुला हूप’ मध्ये मास्टर आहे. ती कमालीचं हुपिंग करते. शिवानीला हुपिंग करताना बघणं एक पर्वणी आहे. गिरगावात गुढीपाडव्याच्या शोभायात्रेत तर तिने साडी नेसून हुपिंग केले आणि साऱ्यांना थक्क करून सोडले. आपल्या आवडीचं तिने ‘प्रोफेशन’मध्ये रुपांतर केलं आहे. शिवानीने लहान वयात ‘हुला हूप’चे क्लासेस सुरू करून शिकवायला सुरुवात केली आहे.

शिवानी धोपावकर सात- आठ वर्षांची असताना तिला हूप म्हणजेच रिंग गिफ्ट मिळाली होती. ती हूप घेऊन कमरेभोवती फिरवत रहायची. यातून ती ही कला शिकली. शिवानीने बी. एससी. आय.टी. चे शिक्षण घेतले. शिक्षण सुरू असताना हुपिंगचे क्लासेस कुठे आहेत का, याचा शोध घेतला. स्वतः इंटरनेटवर सार्ंचग करून ती शिकली.  बाली येथील मुलीकडे ऑनलाईन क्लासही तिने केला. आपल्याकडे ‘हुला हूप’चे क्लासेस नाहीत. त्यामुळे असे क्लासेस सुरू करायचे तिने ठरवले.

हुपिंगचे वेगवेगळे प्रकार असतात. जिम्नॅस्टिक, योगा, डान्स असे फॉर्म असतात. त्यानुसार शिवानी प्रशिक्षण देते. शारीरिकदृष्टय़ा तंदुरुस्त राहण्यासाठी हुपिंग फायदेशीर ठरते. हुला   हूपमध्ये जागतिक विक्रम करण्याचा तिचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने तिची वाटचाल सुरू आहे. एका कंपनीत आयटी जॉब करत तिने ताडदेव येथील एका स्टुडिओत क्लासेस नुकतेच सुरू केले आहेत.  प्रत्येक रविवारी ती वर्कशॉप घेते. तासाभराचे प्रशिक्षण लहान मुले आणि मोठय़ांना देते. इन्स्टाग्रामवर ती हुपिंगचे व्हिडीओही पोस्ट करून माहिती देते.

हुला हूप आर्टिस्ट म्हणून शिवानीला दोन जाहिराती मिळाल्या आहेत. एका जाहिरातीत ती जॅकलिन फर्नांडिससोबत दिसते. ‘हुला हूप’ प्रशिक्षण देणारा स्वतःचा स्टुडिओ सुरू करण्याचे तिचे स्वप्न आहे.