कर्नाटकच्या मुजोरीविरुद्ध संसदेत गदारोळ, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या खासदारांनी लोकसभा दणाणून सोडली

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागात कन्नडिगांनी माजवलेल्या उच्छादाचे तीव्र पडसाद आज संसदेत उमटले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांनी कर्नाटकच्या मुजोरीविरुद्ध लोकसभेत जोरदार आवाज उठवला. यावेळी कर्नाटकच्या खासदारांनी नाक खुपसण्याचा प्रयत्न केल्याने सभागृहात शाब्दिक चकमक झडली आणि प्रचंड गदारोळ झाला. त्यानंतर संसद भवन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ासमोरही राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या खासदारांनी निदर्शने केली. ‘बिदर, भालकी, बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’, अशा घोषणांनी यावेळी संसद भवन परिसर दणाणून गेला. दरम्यान, सीमाभागात तणावाची स्थिती कायम असून चिपळूण, संभाजीनगर, सोलापूर येथे आज कर्नाटकच्या बसेसना लक्ष्य करण्यात आले, तर मुंबईत आणि नाशिकमध्ये कर्नाटक बँकेच्या फलकाला काळे फासण्यात आले.

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आज सुरुवात झाली. सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यानंतर शून्य पहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार विनायक राऊत यांनी सीमाप्रश्नाचा मुद्दा मांडत कर्नाटकाच्या दंडेलीकडे सभागृहाचे लक्ष वेधले. या मुद्दय़ावरून शिवसेना आणि कर्नाटकाच्या खासदारांमध्ये जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली. त्यामुळे सभागृहात चांगलाच गदारोळ झाला. कर्नाटकाचे सरकार जोरजबरदस्तीने वागत असून सीमाभागांतील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण करत असल्याचा आरोप शिवसेना खासदारांनी केला. त्याला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न कर्नाटकातील खासदारांनी केला. यावेळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

कर्नाटक सरकारचा धिक्कार असो…
शिवसेना नेते, खासदार विनायक राऊत यांनीही लोकसभेत आक्रमक भूमिका मांडली. सुप्रिया सुळे यांनी सीमाभागाबाबत उपस्थित केलेला मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न अनेक वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना बेळगाव, निपाणी, कारवार आणि सीमा भागातील गावांवर, तेथील मराठी भाषिकांवर कर्नाटक सरकार अन्याय आणि अत्याचार करत आहे. त्याचा आम्ही धिक्कार आहोत, असे राऊत म्हणाले. या सगळय़ामागे महाराष्ट्र तोडण्याचे कारस्थान असून ते आम्ही यशस्वी होऊ देणार नाही, असा इशाराही राऊत यांनी दिला. कर्नाटकने महाराष्ट्राच्या मंत्र्यांना प्रवेशबंदी केली आहे. देशातील हा असा पहिलाच प्रकार असल्याकडेही राऊत यांनी लक्ष वेधले.

हा दोन राज्यांमधील प्रश्न; केंद्र काय करणार?
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागात ज्या हिंसक घटना घडल्या आहेत त्यात केंद्र सरकारने लक्ष घालावे, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली असता लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी त्यास नकार दिला. ’तुमच्या यासंदर्भातील कोणत्याही वक्तव्याची लोकसभेच्या रेकॉर्डवर नोंद होणार नाही,’ असे नमूद करत हा दोन राज्यांमधील प्रश्न असून यात केंद्र काय करणार, असा उलट सवाल त्यांनी केला.

भाजपचे खासदार गप्प
कर्नाटक सरकारविरुद्ध लोकसभेत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आवाज उठवत असताना महाराष्ट्रातील भाजप खासदार मात्र मूग गिळून गप्प बसले होते. सीमाभागातील मराठी बांधवांना धीर देणारा ’ब्र’देखील त्यांनी काढला नाही.

राज्यसभेतही स्थगन प्रस्ताव
कर्नाटकच्या दंडेलीविरोधात शिवसेनेने राज्यसभेतही स्थगन प्रस्ताव दिला होता. खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी हा प्रस्ताव दिला.

शिवरायांच्या पुतळय़ाजवळ आंदोलन
शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांनी संसद भवन परिसरातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापुढे कर्नाटकच्या निषेधार्थ जोरदार घोषणा दिल्या. बेळगाव, निपाणी, कारवारसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, कर्नाटकमधील भाजप सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणा देत या खासदारांनी परिसर दणाणून सोडला. खासदार विनायक राऊत, अरविंद सावंत, राजन विचारे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, सुनील तटकरे व अमोल कोल्हे यांनी या आंदोलनात सहभाग घेतला.

महाराष्ट्र तोडण्याचे षड्यंत्र आहे काय? सुप्रिया सुळे कडाडल्या

कर्नाटकात गेल्या दहा दिवसांपासून महाराष्ट्रविरोधी कारवाया सुरू आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री सातत्याने महाराष्ट्रविरोधी बोलतात. महाराष्ट्रातील गावांवर दावा सांगतात. यामागे महाराष्ट्र तोडण्याचे षड्यंत्र आहे काय, असा सवाल करत राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज लोकसभेत केंद्र आणि कर्नाटकातील भाजप सरकारला खडे बोल सुनावले.

सीमावादावरून गेले काही दिवस सीमाभागात तणावाचे वातावरण आहे. मंगळवारी बेळगाव-हिरेबागवाडी येथील टोल नाक्यावर महाराष्ट्र पासिंगच्या ट्रकवर कन्नड रक्षण वेदिका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली. याचे तीव्र पडसाद आज संसदेतही उमटले. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या गंभीर मुद्याकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे लक्ष वेधत सीमा वादाच्या मुद्यावर आपली भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली.

महाराष्ट्रात एक नका प्रश्न उभा राहिला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री काहीही बोलत आहेत. काल तर हद्दच झाली. कर्नाटक सीमेकर महाराष्ट्राचे लोक जाणार होते. पण त्यांना मारहाण करण्यात आली. आजपर्यंत एकावरही तेथील सरकारकडून कारवाई करण्यात आलेली नाही. गेल्या दहा दिवसांपासून महाराष्ट्राच्या किरोधात षडयंत्र सुरू आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे. तरीही कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या किरोधात बोलतात. महाराष्ट्र तोडण्याची भाषा करतात. हे चालणार नाही. हा देश एक आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना किनंती आहे की, त्यांनी याकर काहीतरी बोलाके, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली.

शिवसेना, राष्ट्रवादीचे खासदार केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेणार
कर्नाटकच्या दादागिरीविरोधात संसदेत एकत्रितपणे आवाज उठविल्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस खासदारांचे शिष्टमंडळ उद्या गुरुवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेण्याची शक्यता आहे. कर्नाटकच्या दंडेलशाहीविरोधात महाराष्ट्राची भूमिका मांडण्यासाठी हे खासदार उद्या दुपारी केंद्रीय गृहमंत्र्यांना भेटण्याची शक्यता आहे.

महाविकास आघाडी आक्रमक; शनिवारी कोल्हापुरात उग्र आंदोलन

शिवरायांचा भाजपकडून सातत्याने होणारा अवमान, सीमाप्रश्नी कन्नडीगांची सुरू असलेली दंडेलशाही, याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी महाविकास आघाडीकडून शनिवारी (दि. 10) कोल्हापुरात निषेध आंदोलन करण्यात येणार आहे. अरे ला कारे करण्यात कोल्हापूरकर कमी नाहीत, पण सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या समाधीस्थळी हे आंदोलन होणार आहे.

चिपळूणमधील उमरोली गावात कर्नाटकमधून आलेला मालवाहू ट्रक युवासेनेच्या कार्यकर्त्यांकडून रोखण्यात आला. त्यावर ‘जय महाराष्ट्र’ लिहून भगवा झेंडा फडकवत कर्नाटकला इशारा देण्यात आला.