माझ्या नावापुढे साधे खासदारही लिहिले नाही; सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेवरून अरविंद सावंत यांचा संताप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानात डिजीटल पद्धतीने विविध विकास कामांचे भूमीपूजन आणि लोकार्पण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका देताना त्यावर नाव सुद्धा न टाकल्याने अरविंद सावंत यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच पाठवण्यात आलेल्या पत्रिकेत माननीय नाहीच, तसेच खासदारही लिहिले नसल्याने त्यांनी संताप व्यक्त केला आहे.

राज्यशासन आणि मुंबई महापालिकेचा हा कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम भाजपचा नाही. पंतप्रधान मोदी हे देशाचे पंतप्रधान म्हणून वागताना दिसत नाही. त्यामुळे हा कार्यक्रम भाजपचा आहे, असे त्यांना वाटते काय. काही वेळापूर्वीच राज्य शासनाचे अधिकारी निमंत्रण द्यायला आले होते. या पत्रिकेवर मी सोडून मुंबईच्या पाच खासदारांचे नाव आहे. यामध्ये दोन मिंधे गटाचे आणि तीन भाजपाचे आहेत. तसेच या पत्रिकेच्या पाकिटावरही माझे नाव नाही. काही दिवसांपूर्वीही मला एक निमंत्रण पत्रिका आली होती, त्यावर केवळ अरविंद सावंत असे लिहिले होते. माननीय तर सोडा, माझ्या नावापुढे साधे खासदारही लिहीले नव्हते. त्यामुळे हा कार्यक्रम कोणाचा आहे आणि कशासाठी आहे, असा सवाल त्यांनी केला आहे. या गोष्टी अतिशय स्पष्टपणे जनतेपुढे आले आहे. हा कार्यक्रम फक्त मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर प्रसिद्धी करण्यासाठी केलेला कार्यक्रम आहे, अशी टीका अरविंद सावंत यांनी केली आहे.

सावंत यांनी पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्यावरूनही टीकास्त्र सोडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणारे प्रकल्प तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात पूर्ण झालेले आहेत. फक्त महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवत त्याचं उद्घाटन आणि लोकार्पण करण्यात येत आहे. ‘खोटं बोला पण रेटून बोला’ यामध्ये माहीर असेलल्या भाजपचा हा उपक्रम आहे, अशी टीकाही त्यांनी केली.