
जामऋषी नगर, मालाड (पू.) येथे लागलेल्या आगीत झोपडय़ा जळालेल्या रहिवाशांना शिवसेनेने मदतीचा हात दिला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विभागप्रमुख-आमदार सुनील प्रभू यांच्या हस्ते आगीत मृत पावलेल्या मुलाच्या कुटुंबीयांना एक लाख रुपयांची मदत दिली. तसेच झोपडय़ा जळालेल्या कुटुंबांना तात्पुरत्या स्वरूपात प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत वितरित करण्यात आली.
जामऋषी नगर येथील झोपडय़ांना आग लागल्याची घटना समजताच आमदार सुनील प्रभू यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली होती. तसेच आगीत जळालेल्या झोपडय़ा वन विभागाच्या हद्दीतील असल्याने संबंधित रहिवाशी नैसर्गिक आपत्तीअंतर्गत दिल्या जाणाऱया मदतीला पात्र नाहीत. त्यामुळे खास बाब म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाद्वारे दिली जाणारी विशेष मदत बाधित कुटुंबाना देण्याची मागणी प्रभू यांनी मुख्यमंत्री कार्यालय, पालकमंत्री उपनगर जिल्हा तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. मात्र अद्याप मदत न मिळाल्याने त्यांनी पुन्हा मदत देण्याची मागणी सुनील प्रभू यांनी राज्य सरकारकडे केली आहे. यावेळी विधानसभा संघटक प्रशांत कदम, उपविभागप्रमुख गणपत वारिसे, युवासेना कार्यकारिणी सदस्य रूपेश कदम, उपविभाग संघटक सानिका शिरगावकर, शाखाप्रमुख मोहन परब, संजीवनी रावराणे, युवासेनेचे चेतन जाधव, राजेश साळुंखे, कृष्णा प्रसाद आदी उपस्थित होते.






























































