
दादर पश्चिम येथील भवानी शंकर रोड, एस. के. बोले रोड तसेच परिसरातील काही रस्ते वाहतुकीसाठी एकमार्गी (वन वे) करण्यात आल्यामुळे नागरिकांना मोठय़ा गैरसोयींना सामोरे जावे लागत होते. नागरिकांच्या तीव्र विरोधाची दखल घेत शिवसेनेने जोरदार आंदोलन करून हा प्रश्न लावून धरला होता. शिवसेनेच्या दणक्यानंतर संबंधित प्रशासनाने आता हे रस्ते पुन्हा दुहेरी मार्ग करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे स्थानिकांनी शिवसेनेचे आभार मानले आहेत.
दादर पश्चिम येथील एस. के. बोले मार्ग, भवानी शंकर रोड आणि कबुतरखाना परिसरातील दुतर्फा रस्ता वाहतूक पोलिसांनी अचानक एकमार्गी केल्यामुळे स्थानिकांना मोठय़ा प्रमाणावर गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. याच्या निषेधार्थ शिवसेनेतर्फे आंदोलन करण्यात आले होते. तसेच विभागात सह्यांची मोहीम राबविण्यात आली होती.
संबंधित रस्ते पूर्वीप्रमाणे दुतर्फा वाहतूकीसाठी खुले करण्यात यावे, अशी मागणी विभागप्रमुख – आमदार महेश सावंत, शिवसेना उपनेत्या – नगरसेविका विशाखा राऊत, शिवसेना सचिव – नगरसेवक साईनाथ दुर्गे यांनी लावून धरली होती. यामुळे दादर परिसरातील रहिवासी, प्रवासी आणि व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे.


























































