पुन्हा एकदा महाराष्ट्राचे लचके तोडण्याचे प्रयत्न होत आहेत, संजय राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोमवारी मुंबईत होणारी महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा ही ऐतिहासिक होणार असून या सभेला तीनही पक्षांचे प्रमुख लोकं उपस्थित राहतील. महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर आणि अस्मितेवर घाला घालणारे राजकारण सुरु असल्याने या सभेला महत्व असल्याचे मत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले.

ते म्हणाले की, “शिवसेनेकडून सोमवारच्या सभेचं मोठ्याप्रमाणात आयोजन होत आहे. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे या सभेत जास्त लक्ष घालत आहेत. महाराष्ट्र दिनी महाराष्ट्राच्या राजधानीत वज्रमूठ सभा होणं याला विशेष महत्व आहे. सभेसाठी 1 मे या महाराष्ट्र दिनाची निवड यासाठी केली आहे, कारण महाराष्ट्र सध्या संकटात आहे. पुन्हा एकदा महाराष्ट्राचे लचके तोडण्याचे प्रयत्न होत आहेत. महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत घाणेरडं राजकारण सुरु आहे. महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर आणि अस्मितेवर घाला घालणारे राजकारण सुरु आहे. अशा परिस्थितीत या सभेला महत्व असून ही सभा ऐतिहासिक होणार आहे.”

काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीनही पक्षांचे प्रमुख लोकं या सभेला उपस्थित राहतील. अजित पवार व नाना पाटोले हे सभेला उपस्थित राहणार आहेत. सभा मुंबईत होत असल्याने भाषणाचे मुख्य आकर्षण उद्धव ठाकरेच राहतील. महाविकास आघाडीच्या सभेला लोकं लांबून येतात. जरी मुंबईत सभा असली तरी ठाण्यापासून लोकं येतात. त्यांना सुरक्षित परत जायचं असतं अशावेळेस सभा फार न लांबवता प्रत्येक पक्षाच्या दोन प्रमुख लोकांनी भाषण करावं ही भूमिका आमची आहे” असं राऊत म्हणाले.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींची ‘मन की बात’ ऐकण्यास उपस्थित असणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर टीका करताना राऊत म्हणाले की, “सरकारला किती वेळ आणि काम आहे हे या निमित्ताने दिसतंय. केंद्राचे प्रमुख आणि राज्याचे प्रमुख हे भाषण ऐकायला तासनतास एकत्र बसतात आणि इव्हेंट करतात, हे यानिमित्ताने दिसतंय. या राज्यामध्ये आणि देशामध्ये अनेक प्रश्न आहेत, मात्र त्यावर ‘मन की बात’ केली जात नाही. त्याचं केवळ राजकारण केलं जातय.”

पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच असेल या जयंत पाटलांच्या विधानावर राऊत म्हणाले की, “त्यासाठी आधी आपण एकत्र बसू, त्यानंतर सत्ता येईल मग महाविकास आघाडीची बैठक होईल आणि त्यानंतर मुख्यमंत्री नक्कीच महाविकास आघाडीचा होईल. त्याविषयी दुमत नाही. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करणं हा महाविकास आघाडीचा निर्णय होता. त्यामुळे भविष्यात अशाप्रकारचे निर्णय घेतले जातील. प्रत्येक पक्षाचे वेगळे मेळावे होतात त्यावेळेस त्या त्या पक्षाचे नेते बोलतात. मात्र ज्यावेळेस महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र बसतो, तेव्हा महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री व्हावा अशी आमची भाषा असते.”