
ईडी सरकारच्या मुख्यमंत्र्यांची सुपारी घेऊन आणि मिंधे गटाचे मांडलिकत्व पत्करून जर पोलीस निष्ठावंत शिवसैनिकांना संपवण्याचा प्रयत्न करीत असतील तर खपवून घेतले जाणार नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे संयमी आहेत म्हणून महाराष्ट्र शांत आहे. नाहीतर तुमची पळताभुई थोडी झाली असती. विनाकारण तुम्ही शिवसैनिकांना त्रास देत असाल तर आमच्या हातात आता मशाल आणि मनात विस्तव आहे. त्यामुळे आगीशी खेळण्याचा प्रयत्न करू नका, असा इशारा शिवसेनेने आज नवी मुंबई आणि ठाण्याच्या पोलिसांना दिला.
दमदाटी करून, आमिषे दाखवूनही ‘मातोश्री’चे निष्ठावंत शिवसैनिक मिंधे गटात जात नसल्याने सरकारने पोलीस यंत्रणेचा गैरवापर करून अनेक पदाधिकाऱयांची छळवणूक सुरू केली आहे. ठाण्यातील शिवसैनिक व महिला आघाडी कार्यकर्त्यांच्या रोजीरोटीवर वरवंटा फिरवण्यात आला. नवी मुंबईतील ज्येष्ठ नगरसेवक ए. के. मढवी यांना तडीपार करण्यात आले आहे. शिवसेना खासदार राजन विचारे यांच्या पोलीस संरक्षणात अचानक कपात झाली. अनेक पदाधिकाऱयांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांची छळवणूक सुरू झाली आहे. या खुनशी कारवाईचा जाब विचारण्यासाठी शिवसेनेच्या वतीने आज नवी मुंबई पोलीस आयुक्तालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी बोलताना ‘आज तुमचे सरकार असले तरी उद्या जाणार आहे. त्यावेळी मात्र जितका त्रास दिला आहे तो व्याजासकट वसूल करू’, असा इशारा शिवसेना नेते, खासदार अरविंद सावंत यांनी दिला.
बेलापूर येथे जुन्या महापालिका मुख्यालयासमोर आल्यानंतर पोलिसांनी मोर्चा अडवला. त्यानंतर शिवसेनेच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त बिपिनकुमार सिंह यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. या मोर्चात शिवसेना नेते, खासदार अरविंद सावंत, शिवसेना नेते, आमदार भास्कर जाधव, शिवसेना सचिव, खासदार विनायक राऊत, खासदार राजन विचारे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर, आमदार अजय चौधरी, सुनील प्रभू, विलास पोतनीस, संजय पोतनीस, सुनील शिंदे, मनीषा कायंदे, शिवसेना उपनेत्या अनिता बिर्जे, जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, द्वारकानाथ भोईर, केदार दिघे, बबन पाटील, शिरीष घरत, मनोहर भोईर, चंद्रकांत बोडारे, कल्याण लोकसभा संपर्कप्रमुख सुभाष भोईर, ठाणे लोकसभा संपर्कप्रमुख मधुकर देशमुख, आप्पा पराडकर, भाऊ चौधरी, संजय तरे, जिल्हा संघटक रंजना शिंत्रे, विजया पोटे, नीता परदेशी, सुवर्णा जोशी, ममता पाटील, विनया मढवी, युवासेना सहसचिव करण मढवी आदी सहभागी झाले होते.
दम असेल तर एन्काऊंटर करा
एम. के. मढवी यांना एन्काऊंटरची धमकी देणारे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी हिंमत असेल तर येथे येऊन एन्काऊंटर करून दाखवावे, असे आव्हान देताना येत्या अधिवेशनात या संपूर्ण प्रकरणाबाबत आवाज उठवण्यात येणार आहे, असे यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्र्यांवर शंभर गुन्हे
राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या विरोधात शंभर गुन्हे दाखल आहेत, अशी कबुली त्यांनी स्वतःच दिली आहे. पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी उपमुख्यमंत्र्यांना तडीपार करण्याची हिंमत करून दाखवावी. सुपारी घेऊन त्रास देणाऱयांवर उद्या सेवेतून तडीपार होण्याची वेळ येणार आहे, असा संताप यावेळी शिवसेना सचिव, खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केला.


























































