नगर महानगरपालिकेवर पुन्हा भगवा फडकविणारच -आ.नरेंद्र दराडे

45

सामना प्रतिनिधी । नगर

सत्तेवर येतांना अनेक भुलथापा दिल्या गेल्या, नोटाबंदी नंतर अर्थव्यवस्था कोलमडलीच मात्र गोरगरीब जनता भरडली गेली, अनेक बेघर झाले. योजना पूर्ण व्हायला तयार नाही. जनता आता त्यांच्यावर आता विश्वास ठेवायला तयार नाही. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधान भवनावर भगवा फडकविण्याचा निर्धार केला. तो आपल्याला पूर्णत्वाला न्यायवयाचा असून येथील महानगरपालिकेवर पुन्हा भगवा फडकविल्याशिवाय राहणार नाही, आ. नरेंद्र दराडे यांनी केले.

प्रभाग क्र.2 मधील निर्मलनगर, भगवानबाबा चौक येथे शिवसेनेच्या प्रचारार्थ आयोजित सभेत आ. नरेंद्र दराडे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उपनेते अनिल राठोड, ज्येष्ठ नेते घनश्याम शेलार, नामदेव पवार, उमेदवार पांडूरंग दातीर, वैभव सुरवसे, शोभा सानप, शिल्पा जायभाय, प्रशांत पाटील, संजय आव्हाड आदी उपस्थित होते.

दराडे म्हणाले, भाजपाच्या सरकारने शेतकऱ्यांना गाजर दाखवून कर्जमाफीच्या नावाखाली त्यांची फसवणूक केली. उद्योग-धंद्यांचीही तिच अवस्था अशा एक ना अनेक समस्यांमध्ये लोकांवर अन्याय केला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे आता शिवसेना हा एकच पर्याय आहे, जो सर्वसामान्यांना न्याय देऊ शकेल. त्यामुळे नगरच्या जनतेने शिवसेनेच्या मागे उभे राहून येथील सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केली.

याप्रसंगी उपनेते अनिल राठोड म्हणाले, हा भाग स्व. गोपीनाथ मुंडे यांना मानणारा आहे. त्यांच्या काळातील भाजप आता राहिला नाही. यापूर्वी भाजपाबरोबर युती असतांना भाजपाचे उमेदवार असत. परंतु त्यांनी या भागाचा विकास न करता भकास करुन टाकला आहे. येथील नागरिक समस्यांकडे केलेले दुर्लक्षामुळे हा भाग विकासापासून वंचित राहिला आहे. शिवसेनेने या भागात प्रथमच उमेदवार उभे केले आहे. त्यामुळे येथील नागरिकांनी शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून देऊन आपल्या भागाचा विकास साधावा, असे आवाहन केले.

याप्रसंगी ज्येष्ठ नेते घनश्याम शेलार यांनी भाजपावर टिका करतांना म्हणाले, खा.दिलीप गांधी यांनी आणलेला विकास निधी शहराच्या विकासासाठी मार्गी लावला का? आणि जर तो मार्गी लावला असेल तर कोणती मोठी विकास कामे या शहरात उभी राहिली. फक्त आश्वासने देऊन नागरिकांची फसवणूक करण्याचे काम हे करत आहेत. त्यामुळे आता नागरिकांनी शिवसेनेच्या उमेदवारांना मतदान करुन निवडून द्यावे, तेच आपल्या भागाचा विकास करतील.

कार्यक्रमाचे प्रास्तविक पांडूरंग दातीर यांनी केले तर आभार प्रशांत पाटील यांनी मानले.

आपली प्रतिक्रिया द्या