
सामना प्रतिनिधी, कर्जत
कर्जत तालुक्यातील शिवसेनेचा वारू जोराने दौडत असून रविवारी झालेल्या दोन ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये शिवसेनेने शिरसे ग्रामपंचायतीवर एक हाती भगवा फडकवला असून थेट सरपंचासह सर्वच उमेदवार निवडून आले आहेत. शिवसेनेचे विधानसभा संघटक संतोष भोईर यांची ही ग्रामपंचायत असून त्यांनी विरोधक असलेल्या राष्ट्रवादीला चारीमुंड्या चीत केले आहे.
दोन वर्षांपूर्वी माथेरान नगरपालिका, त्यांनतर कर्जत नगरपालिका एक महिन्यापूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत सहा ग्रामपंचायतीवर आणि आता झालेल्या दोन ग्रामपंचायतींपैकी एकीवर भगवा फडकला आहे. त्यामुळे कर्जतमध्ये लोकसभेच्या विजयाची ही नांदी असल्याचे बोलले जात आहे. कर्जत तालुक्यातील शिरसे आणि पाथरज दोन ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकासाठी 24 मार्च रोजी मतदान झाले होते. त्या मतांची मोजणी केली असता शिरसे ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेने थेट सरपंचासह एकहाती सत्तेचे वर्चस्व मिळविले असून पाथरज ग्रामपंचायतचे थेट सरपंचपदी सर्वपक्षीय आघाडीने मिळविले आहे.
शिरसे ग्रामपंचायतीमध्ये यावेळी सार्वत्रिक निवडणूक झाली. त्यात शिवसेनेच्या आरती संदीप भोईर यांनी मोठा विजय मिळवताना राष्ट्रवादी आघाडीच्या विमल डांगरे यांचा पराभव केला. आरती भोईर यांना 1207 मते तर डांगरे यांना 282 मते मिळाली. या निवडणुकीत शिवसेनेने एक जागा बिनविरोध जिंकली होती,तर निवडणूक झालेल्या सर्व 8 जागा जिंकून मतदारांनी शिवसेनेचे विधानसभा संघटक संतोष मारुती भोईर यांच्या या ग्रामपंचायतीमधील 20 वर्षांच्या कामाची पोचपावती पुन्हा एकदा दिली.
पाथराज ग्रामपंचायतीमधील 13 पैकी 10 जागा बिनविरोध झाल्या होत्या, तर एक जागा रिक्त राहिली होती. त्यामुळे तेथे सदस्यांच्या दोन जागांसाठी आणि थेट सरपंचपदासाठी निवडणूक झाली. थेट सरपंच सर्वसाधारण महिला राखीव असून सर्वपक्षीय आघाडीच्या जोत्स्ना घोडविंदे यांनी हर्षदा रसाळ यांचा पराभव करून विजय मिळविला. घोडविंदे यांना 1783 मते तर रसाळ यांना 1486 मते मिळाली.
ग्रामपंचायत शिरसेमधील शिवसेनेचे विजयी उमेदवार
भुऱ्या वाघमारे-३९१
मंजुळा डांगरे-३७९
गीता देशमुख-३६७
पुंडलिक भोईर-३६२
शैला गुरव-३६९
ताई पवार-बिनविरोध
अर्चना वाघमारे-४३१
महेंद्र भोईर-३९४
कल्पना गायकवाड-४५३





























































