भाजपच्या वाचाळ नेत्याला चोप देणाऱ्या शिवसैनिकांना जामीन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या भाजप नेत्याला चोप दिल्याप्रकरणी पंढरपूर शहर पोलिसांनी 20हून अधिक पदाधिकारी आणि शिवसैनिकांवर मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. यापैकी 17 जणांना पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने या सर्वांची जामिनावर सुटका केली आहे.

भाजपच्या वतीने करण्यात आलेल्या वीजबिल माफी आंदोलनात पंढरपूर भाजपचे माजी शहराध्यक्ष शिरीष कटेकर यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य केले होते. त्यामुळे संतप्त शिवसैनिकांनी कटेकर यांना काळ्या ऑइलने आंघोळ घालत, साडी आणि बांगडय़ांचा आहेर दिला होता. यानंतर कटेकर यांनी शिवसेना पदाधिकाऱयांविरोधात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी 20हून अधिक शिवसैनिकांवर गुन्हा दाखल केला होता. तर, शिवसेना शहरप्रमुख रवी मुळे यांनीही दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी कटेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.

शहरप्रमुख रवींद्र मुळे, संदीप केंदळे, जयवंत माने, सुधीर अभंगराव, लंकेश बुराडे, विनय वनारे, सचिन बंदपट्टे, पंकज डांगे-कोळी, सिद्धनाथ कोरे, समाधान अधटराव, अरुण कांबळे, बाबा अभंगराव, ईश्वर साळुंखे, बालू देवकर, सूरज गायकवाड, तानाजी मोरे, अविनाश वाळके यांच्यासह 17 जणांना अटक करून न्यायालयापुढे उभे केले असता न्यायालयाने सर्वांचा जमीन मंजूर केला.

न्यायालयात शिवसेनेकडून ऍड. यासीन शेख, ऍड. अमोल नागटिळक व ऍड. विजयकुमार जाधव यांनी काम पाहिले. माजी जिल्हाप्रमुख साईनाथ अभंगराव, प्रा. शिवाजी सावंत, अनिल सावंत, संजय साठे, अरुण कोळी यांनी आंदोलनकर्त्या शिवसैनिकांचा सत्कार केला. यावेळी सामान्य कार्यकर्त्याने टीका करताना आपली पात्रता किती आहे हे पाहून टीका करावी. भाजप नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्याला वेळीच समज द्यावी, अन्यथा यापेक्षा वेगळय़ा भाषेत उत्तर दिले जाईल, असा इशारा शिवसेना सोलापूर जिल्हा समन्वयक प्रा. शिवाजी सावंत यांनी दिला आहे.