विधान परिषदेसाठी शिवसेनेचे सुनील शिंदे यांचा अर्ज दाखल;10 डिसेंबर रोजी निवडणूक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेसाठी शिवसेनेकडून आज माजी आमदार सुनील शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. 10 डिसेंबर रोजी ही निवडणूक होणार आहे.

मुंबई महानगरपालिकेतून दोन जागांवर उमेदवार निवडून जाणार आहेत. भाजपने राजहंस सिंह यांना उमेदवारी दिली असून त्यांनी सोमवारी आपला अर्ज दाखल केला. शिवसेनेचा एक आमदार विधान परिषदेवर निवडून जातो. 2016 मध्ये या जागी शिवसेनेकडून रामदास कदम हे निवडून गेले होते. तर यावेळी विधान परिषदेच्या जागेवर सुनील शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. सुनील शिंदे यांनी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासाठी विधानसभा निवडणुकीत वरळी मतदारसंघ सोडला होता. दरम्यान,  अर्ज दाखल करताना सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, परिवहनमंत्री अॅड. अनिल परब, शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई, खासदार अरविंद सावंत,  महापौर किशोरी पेडणेकर, आमदार अजय चौधरी, रमेश कोरगावकर, सभागृह नेत्या विशाखा राऊत, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, ’बेस्ट’चे अध्यक्ष आशीष चेंबूरकर, सुधार समिती अध्यक्ष सदानंद परब, नगरसेवक अमेय घोले, भारतीय कामगार सेनेचे सहचिटणीस निशिकांत शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

असा आहे शिंदे यांचा कार्यकाळ

शिवसैनिक ते आमदार असा सुनील शिंदे यांचा प्रवास राहिला आहे. 2007 मध्ये ते मुंबई महानगरपालिकेत निवडून आले होते. बेस्ट समितीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. 2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले सचिन अहिर यांचा पराभव करून विधानसभेवर आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांना या निवडणुकीत 60 हजार 625 मते मिळाली होती, तर सचिन अहिर यांना 37 हजार 613 मते मिळाली होती. 2015 मध्ये त्यांच्याकडे उत्तर नगर जिल्हा संपर्कप्रमुखाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.