
न्यूझीलंड दौऱ्यावरील दोन कसोटी सामन्यांच्या कसोटी मालिकेत पाकिस्तानचा सपशेल धुव्वा उडाल्यानंतर माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर भयंकर चिडला. आमचे क्रिकेट बोर्डच नालायक आहे. त्यांनी क्लब लेव्हलचा संघ निवडून न्यूझीलंड दौऱ्यावर पाठविला, अशा परखड शब्दांत त्याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर(पीसीबी) टीका केली.
पाकिस्तानने फारसा प्रतिकार न करता 0-2 फरकाने कसोटी मालिका गमावल्यानंतर शोएब अख्तरने यू टय़ुबवर स्वतःचा एक व्हिडीओ अपलोड करून पाकिस्तान सध्या शालेय स्तरावरील क्रिकेट खेळत असल्याची बोचरी टीका केली. मी क्लब आणि न्यूझीलंड संघातील सामना बघितला. होय, मी पाकिस्तान संघाला क्लब म्हणालो. कारण आमचे क्रिकेट बोर्डच नालायक आहे. त्यांनी क्लब दर्जाचा संघ निवडून न्यूझीलंड दौऱ्यावर पाठविला, असा टोला शोएबने लगावला.



























































