
कोपरगाव तालुक्यातील संवत्सर रामवाडी शिवारात ट्रान्स्फॉर्मरमधील झालेल्या शॉर्टसर्किटमुळे येथील कृष्णराव नामदेवराव परजणे यांची अडीच एकर डाळींब बाग व त्यातील ठिबक सिंचनासह अन्य साहित्य जळून खाक झाले. यामुळे डाळिंबाच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
संवत्सर येथील शेतकरी व कोपरगांव पंचायत समितीचे माजी सदस्य कृष्णराव परजणे पाटील यांची रामवाडी शिवारात बागायती शेती असून त्यांच्या सर्व्हे नं. 101 मधील भगवा जातीच्या डाळींबाच्या बागेला मंगळवार दि. 16 मे 2023 रोजी दुपारी अडीच वाजेच्या दरम्यान शॉर्टसर्किटने आग लागली. या आगीत डाळिंबाच्या झाडांना आग लागली. जवळजवळ अडीच एकर बाग आगीत सापडल्याने डाळींब बाग उत्पादन देण्याच्या स्थितीत होती. ट्रान्स्फॉर्मरमधून झालेल्या शॉर्टसर्किटमुळे डाळींब बाग आणि त्यातील ठिबक सिंचनाचे सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. या दुर्घटनेत सुमारे 25 ते 30 लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
यामुळे परजणे यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले याबाबत त्यांनी महावितरणला कळवले. झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून महावितरणने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी परजणे यांनी केली आहे.
आग लागल्याचे लक्षात येताच सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या अग्नीशामक दलास पाचारण करण्यात आले. अग्नीशामक बंब तातडीने पोहोचल्याने आग आटोक्यात आणण्यास मदत झाली. आगीच्या या घटनेमुळे संवत्सर परिसरात खळबळ उडाली आहे.





























































